मोदींनी अमेरिकेत तिरंग्यावर स्वाक्षरी केल्यावरून वादंग
By admin | Published: September 25, 2015 11:38 PM2015-09-25T23:38:46+5:302015-09-25T23:38:46+5:30
शुक्रवारचा दिवस सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळ ढवळून काढणारा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना भेट देण्यासाठी
नवी दिल्ली : शुक्रवारचा दिवस सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळ ढवळून काढणारा ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना भेट देण्यासाठी स्वत: स्वाक्षरी केलेला तिरंगा प्रसिद्ध शेफ विकास खन्ना यांच्याकडे सुपूर्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. खन्ना हे मोदींची स्वाक्षरी दाखवित असलेला फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. हे ध्वजसंहितेचे उल्लंघन ठरत असल्याचे सांगत काँग्रेससह बहुतांश राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठविली. दिवसभर हा गोंधळ सुरू असताना रात्री सरकारने तो तिरंगा नव्हताच असा खुलासा करीत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
शेफ विकास खन्ना यांच्यासोबत एका मुलीने मोदींची भेट घेतली तेव्हा तिने पायाच्या बोटांनी कलाकुसर केलेला कापड त्यांना भेट दिला. मोदींनी या मुलीच्या कलेचे कौतुक करून त्यावर स्वाक्षरी करीत तो खन्ना यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्या कापडाचा रंग पांढरा नव्हता किंवा त्यावर अशोकचक्रही नव्हते, असे सरकारी प्रवक्ते फ्रँक नरोन्हा यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
काँग्रेसने नोंदविला निषेध
तुम्ही कितीही उच्च पदावर असाल राष्ट्रध्वज सर्वोच्च स्थानी असतो, ही बाब पंतप्रधान मोदींनी समजून घ्यायला हवी. मोदींचे हे पाऊल भादंविनुसार गुन्हा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी दिली आहे. आमचे विचार भाजपप्रमाणे संकुचित नाहीत. आम्ही पंतप्रधानपदाचा सन्मान करतो. मोदींनी याबाबत विचार करीत सुधारणात्मक पाऊल उचलायला हवे. राष्ट्रध्वजाचा सन्मान ही १२५ कोटी जनतेची जेवढी जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी पंतप्रधानांचीही आहे, असेही ते म्हणाले.
२००२ मध्ये तयार करण्यात आलेल्या ध्वजसंहितेनुसार तिरंग्यावर कोणतेही शब्द कोरणे किंवा काहीही लिहिणे हा अनादर मानला जातो. २००३ मध्ये त्याबाबत कायदा अस्तित्वात आला. ध्वजसंहितेसंबंधी परिच्छेद २.१ उपपरिच्छेद ६ मध्ये नियम स्पष्ट करण्यात आले आहे.
तिरंग्याचा अनादर किंवा गैरवापर केल्याबद्दल तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तिरंग्याचा वस्त्र म्हणून दुरुपयोग करता येत नाही. तो पायदळी तुडविला जाणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते.
काँग्रेसने अकारण निर्माण केलेला वाद- भाजप
काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिरंग्यावरील स्वाक्षरीबाबत अस्तित्वात नसलेल्या मुद्यावर वाद निर्माण केला आहे. हा वाद असंगत आणि अनावश्यक असा आहे. मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे नैराश्य आल्यानेच प्रत्येक मुद्यावर या पक्षाकडून अनावश्यक विधाने केली जात आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिंहराव यांनी दिली.