‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वरून वाद, अनुपम खेर व मेहतांची एकमेकांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 08:16 IST2024-12-29T08:15:48+5:302024-12-29T08:16:48+5:30
मनमोहन सिंगांच्या निधनामुळे ज्येष्ठ पत्रकार वीर सांघवी यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट करत २०१९ साली प्रदर्शित झालेला पॉलिटिकल ड्रामा चित्रपट ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ यात माजी पंतप्रधानांबद्दल खोटी माहिती दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर मेहतांनी ही पोस्ट शेअर करत मी शंभर टक्के सहमत असल्याचे नमूद केले.

‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’वरून वाद, अनुपम खेर व मेहतांची एकमेकांवर टीका
नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या चित्रपटासंदर्भात एका पत्रकाराने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टवर चित्रपट निर्माते हन्सल मेहता यांनी सहमती दर्शवल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यानंतर चित्रपट अभिनेता अनुपम खेर व हन्सल मेहता यांनी एकमेकांना लक्ष्य केले.
मनमोहन सिंगांच्या निधनामुळे ज्येष्ठ पत्रकार वीर सांघवी यांनी एक्स या सोशल मीडियावर एक पोस्ट करत २०१९ साली प्रदर्शित झालेला पॉलिटिकल ड्रामा चित्रपट ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ यात माजी पंतप्रधानांबद्दल खोटी माहिती दिल्याचा दावा केला होता. त्यानंतर मेहतांनी ही पोस्ट शेअर करत मी शंभर टक्के सहमत असल्याचे नमूद केले. ही पोस्ट शेअर करण्यापूर्वी मेहतांनी आणखी एक पोस्ट करत सिंगांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत देशाने त्यांची माफी मागायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली. इतरांपेक्षा मी त्यांचा जास्त ऋणी आहे. मजबुरी किंवा हेतू काहीही असो, खंत वाटते, असे म्हणत मेहतांनी सिंग यांची माफी मागितली. मात्र, मेहतांनी सांघवींच्या पोस्टचे समर्थन केल्याने खेर नाराज झाले आहेत. त्यांनी मेहता ढोंगी असल्याचा आरोप केला आहे.
खेर यांचे म्हणणे काय?
- मेहतांनी या चित्रपटासाठी ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून काम केले आहे. या सर्व प्रकरणात वीर सांघवी ढोंगी नाहीत. त्यांना चित्रपटाबद्दल नापसंती व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे.
- मात्र, हन्सल मेहता ‘द ॲक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चे ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ होते. इंग्लंडमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना ते उपस्थित होते.
- या चित्रपटासाठी त्यांनी दिलेल्या सर्जनशील माहितीची त्यांना फी मिळाली आहे. त्यामुळे सांघवींच्या वक्तव्याबद्दल १०० टक्के सहमती दर्शवणे हे दुटप्पीपणाचे लक्षण असल्याचे नमूद करत खेर यांनी मेहतांवर टीकेची झोड उठवली.