योगी सरकारमध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीवरून वादळ; ३ मंत्री राजीनामा देण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 10:04 AM2022-07-20T10:04:35+5:302022-07-20T10:05:03+5:30
काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या जितीन प्रसाद यांना भाजपानं मंत्रिमंडळात घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या बदल्यांमुळे जितीन प्रसाद चर्चेत आले आहेत
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश योगी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात १०० दिवस पूर्ण होण्यासोबत राज्यात झालेल्या बदल्यांवरून खळबळ माजली आहे. योगी सरकारचे ३ मंत्री चर्चेत आले आहेत. पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांच्या आरोग्य विभागात झालेल्या बदल्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यानंतर आता जितीन प्रसाद यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या बदल्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर पाणी पुरवठा विभागातल्या बदल्यांवरही तणाव असल्याचं बोलले जात आहे.
जितीन प्रसाद यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ३५० हून अधिक अभियंत्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील सुमारे २०० कार्यकारी अभियंता आणि १५० हून अधिक सहायक अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सीएम योगी यांनी केवळ पीडब्ल्यूडी विभागातील बदल्यांची चौकशी केली नाही तर जितीन प्रसाद यांचे ओएसडी अनिल कुमार पांडे यांचीही चौकशी सुरू केली आहे. पांडे यांची सरकारने दक्षता चौकशी आणि विभागीय कारवाईची शिफारसही केली आहे.
काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या जितीन प्रसाद यांना भाजपानं मंत्रिमंडळात घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या बदल्यांमुळे जितीन प्रसाद चर्चेत आले आहेत. बदल्यांच्या चौकशीमुळे ते नाराज असल्याचं समोर आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेऊन ते नाराजी व्यक्त करणार आहेत. मंगळवारी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आरोग्य विभागातील बदल्यांवरही संशय व्यक्त केला जात आहे. एका जिल्ह्यात असणाऱ्या पती-पत्नीला वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली करण्यात आलं आहे. या बदल्यांवर खुद्द मंत्री बृजेश पाठक यांनी प्रश्न उभे केले.
तर राज्यमंत्री असून जलशक्ती मंत्रालयातील अधिकारी ऐकत नसल्याने मंत्री दिनेश खटीक नाराज आहेत. खटीक यांनी बदल्यांची यादी अधिकाऱ्यांकडे दिली होती. परंतु कॅबिनेट मंत्र्यांशी बोला असं अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे नाराज झालेल्या दिनेश खटीक यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला असल्याची चर्चा आहे. परंतु सरकारने या बातमीचं खंडन केले आहे.