अधिवेशनाची तारीख आज ठरणार!
By admin | Published: June 29, 2016 05:58 AM2016-06-29T05:58:21+5:302016-06-29T05:58:21+5:30
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख आणि संपूर्ण कार्यक्रम निश्चित करण्याकरिता गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेतील संसदीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक बुधवारी होणार
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख आणि संपूर्ण कार्यक्रम निश्चित करण्याकरिता गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेतील संसदीय व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक बुधवारी होणार आहे. अधिवेशन जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.
आसाम विधानसभा निवडणुकीत प्रथमच विजय आणि केरळ व पश्चिम बंगालमध्ये उत्कृष्ट कामगिरीमुळे सत्ताधारी भाजपात प्रचंड उत्साह असताना हे अधिवेशन होत आहे. सोबतच मोदी सरकारला दोन वर्षेही पूर्ण झाली आहेत. अधिवेशन १८ जुलैला सुरू होऊन १३ आॅगस्टपर्यंत चालेल असे संकेत आहेत.
राज्यसभेत ४५ तर लोकसभेत पाच विधेयके प्रलंबित आहेत. वरिष्ठ सभागृहात अडकलेल्या विधेयकांमध्ये वस्तू व सेवा कर विधेयकाचाही (जीएसटी) समावेश आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यावर गेल्यावर्षी आॅगस्टमध्ये राज्यसभेत पाठविण्यात आले होते.
सरकारला या सत्रात जीएसटी विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा आहे. अनेक प्रादेशिक पक्षांनी या मुद्द्यावर काँग्रेसची साथ सोडली असून महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांना पाठिंबा देण्यास ते इच्छुक असल्याचे संकेत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)