राज्यसभेतील निवृत्त सदस्यांना दिला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:46 AM2018-03-29T03:46:58+5:302018-03-29T03:46:58+5:30
गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज सतत तहकूब झाले नसते तर निवृर्त्तीपूर्वी अनेक सदस्यांना अभ्यासपूर्ण विचार सभागृहात मांडता आले असते
सुरेश भटेवरा
नवी दिल्ली : गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज सतत तहकूब झाले नसते तर निवृर्त्तीपूर्वी अनेक सदस्यांना अभ्यासपूर्ण विचार सभागृहात मांडता आले असते. काही मुद्दे त्यांच्या हातून निसटून गेले असतील. सभागृह चालले असते तर देशाला काही योगदान दिल्याचे समाधान त्यांना मिळाले असते. राज्यसभेचे २ वर्षांनी एक तृतियांश सदस्य निवृत्त होतात. ते निवृत्त झाले तरी त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. सभागृहाची दारे बंद झाली तरी संसद व पंतप्रधान कार्यालयाची दारे त्यांच्यासाठी खुली राहातील, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी केले.
राज्यसभेतल्या ४0सदस्यांची मुदत मार्च-एप्रिलमध्ये संपत आहे. अखेरचे भाषण करताना काही सदस्य भावनाप्रधान झाले तर अनेकदा हास्याची कारंजीही उसळली. गदारोळाबद्दल बहुतांश ज्येष्ठ सदस्यांनी चिंता व्यक्त केली. सभापती व्यंकय्या नायडूंनी निवृत्त सदस्यांना दिर्घायुरारोग्य लाभो व समाजजीवनात त्यांच्या हातून लोकसेवा घडो असे शुभचिंतन केले.
अरुण जेटली म्हणाले की, अनेक महान संसदपटूंची भाषणे या सभागृहाने ऐकली. पक्षाचे संख्याबळ किती, यावर राज्यसभा सदस्यांचे पुनरागमन अवलंबून असते. मुदत संपल्यामुळे दोन प्रसिद्ध खेळाडू सचिन तेंडुलकर व दिलीप तिर्की, अभिनेत्री रेखा सभागृहातून निवृत्त होत आहेत.
महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडले गेले तेव्हा मी लोकसभेची सदस्य होते. राज्यसभेत विधेयक मंजूरही झाले. अजूनही महिलांना न्याय मिळालेला नाही. मी लोकसभेत असताना १८ महिन्यांत ती बरखास्त झाली. राज्यसभेतही ५ वर्षांची अपुरी टर्मच वाट्याला आली. हा अपुराच योगच बहुदा माझ्या नशिबी असावा.