दोषींना फाशी द्यावी किंवा आजन्म तुरुंगात ठेवावे; बिल्किस प्रकरणातील साक्षीदाराची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 12:55 PM2024-01-13T12:55:36+5:302024-01-13T12:56:00+5:30
"माझ्या डोळ्यांसमोर आई आणि बहिणीला मारले"
अहमदाबाद : “बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी फाशी किंवा आजन्म तुरुंगवास द्यावा, तेव्हाच त्यांना न्याय मिळेल,” अशी भावना या अत्याचारातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने व्यक्त केली आहे.
गुजरातच्या दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यात जमावाने त्यांची (प्रत्यक्षदर्शी साक्षीदार) चुलत बहीण बिल्किस बानो आणि अल्पसंख्याक समुदायाच्या इतर सदस्यांवर हल्ला केला व उसळलेल्या दंगलींमध्ये १४ जणांना ठार केले, तेव्हा हा प्रत्यक्षदर्शी सात वर्षांचा होता. तो आता २८ वर्षांचा आहे आणि त्याची पत्नी व पाच वर्षांच्या मुलासह अहमदाबादमध्ये राहतो. “माझ्या डोळ्यांसमोर माझ्या प्रियजनांची हत्या होताना पाहण्याचा आघात मी सहन केला होता. इतक्या वर्षांनंतरही ते क्षण मला त्रास देतात,” असे तो म्हणाला.
माझ्या डोळ्यांसमोर आई आणि बहिणीला मारले
- ८ जानेवारी रोजी, सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट, २०२२ मध्ये बिल्किस बानोवरील सामूहिक बलात्कार आणि १४ जणांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ११ दोषींना मुदतीपूर्वी सोडण्याचा गुजरात सरकारचा निर्णय रद्द केला.
- “त्यांना मुक्त करण्यात आले, तेव्हा मला खूप वाईट वाटले. मला आता काहीसा दिलासा मिळाला आहे, कारण त्यांना पुन्हा एकदा तुरुंगात पाठविले जाणार आहे.
- त्या दिवशी माझ्या डोळ्यांसमोर मारल्या गेलेल्या १४ जणांमध्ये माझी आई आणि माझी मोठी बहीण होती,” असे तो म्हणाला.