शेती उत्पादन दुप्पट होण्यासाठी सहकार क्षेत्राने नव्या पर्यायांचा शोध घ्यावा- पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 02:53 PM2017-09-21T14:53:43+5:302017-09-21T15:07:32+5:30
लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या सहकार संमेलनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली.
नवी दिल्ली, दि.21- 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे आणि ग्रामिण अर्थव्यवस्था बळकट व्हावी यासाठी सहकार क्षेत्राने मधुमक्षिका पालन, सीविड फार्मिंग (समुद्री उपयुक्त पानांची शेती ) अशा नव्या पर्यायांकडे लक्ष द्यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. तसेच सहकाराचे बीज अधिक सक्षम आणि कायम जिवंत राहिले पाहिजे असेही विधान पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, 'भारतामध्ये सहकार क्षेत्र वाढणं आणि त्याचा विकास होणं अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेक क्षेत्रांमध्ये सहकार क्षेत्र कार्य करु शकतं आणि सकारात्मक बदल घडवू शकतं.'
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल याचा विचार या क्षेत्रातील लोकांनी करावा असे आवाहनही यांनी त्यांनी केले. ते म्हणाले, ' सध्या शेतकरी किरकोळ भावात खरेदी करतात आणि घाऊक पद्धतीत विकतात, ही प्रक्रीया उलट करता येऊ शकते का? जर ते घाऊक भावात (शेतीस आवश्यक गोष्टी) विकत घेऊ लागले आणि किरकोळ बावात विकू लागले तर त्यांना कोणीही लुटू शकणार नाही, इतकेच काय मध्यस्थही त्यांना लुटू शकणार नाहीत.''
Cooperative movements are not only about systems. There is a spirit that brings people together to do something good: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) September 21, 2017
दुग्धउत्पादनातील शेतकऱ्यांचा विकास झाला कारण त्यांनी दुधाची घाऊक भावात खरेदी-विक्री केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सहकार क्षेत्राने अशा प्रकारे काम करण्याची गरज आहे, असे मत पंतप्रधानांनी मांडले. सहकार क्षेत्र साखर आणि दूध या दोन विभागांमध्ये सर्वाधिक काम करत असल्याकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले, आता सहकाराने नव्या क्षेत्रांमधील शक्यतांचा शोध घ्यायला हवा. असे सांगून त्यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू शकेल अशी काही उदाहरणेही दिली. ''युरिया खतामध्ये नीम तेलाची गरज मोठी भासते, हे कडुनिंब गोळा करण्याचे काम महिला करु शकतात. दुसरे क्षेत्र आहे ते मधुमक्षिकापालनाचे. शेतकरी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून 'मधुक्रांती' घडवू शकतात. यातुन मिळणाऱ्या मधालाच केवळ बाजारात किंमत आहे असे नव्हे तर मेणालाही किंमत आहे'' असे मोदी म्हणाले. मासेमारी करणारे लोक हंगाम नसताना सी विड फार्मिंगचा आधार घेऊ शकतात. त्यातून मिळणारे उत्पादन औषध उद्योग आणि खतासाठी वापरले जाऊ शकते असेही ते म्हणाले. अशा प्रकारची लहानलहान पावले उत्पन्न वाढवण्यास उपयोगी पडतील.
लक्ष्मणराव इनामदार यांनी 'सहकार भारती' नावाने मुंबईत 1979 साली चळवळ सुरु केली होती. इनामदार आणि सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या इतर 9 जणांवरती लिहिलेल्या दोन पुस्तकांचे प्रकाशन पंतप्रधान मोदी यांनी केले. यावेळी कृषीमंत्री राधामोहन सिंह, राज्यमंत्री कृष्णा राज आणि गजेंद्र सिंह शेखावतही उपस्थित होते.
सहकाराला संस्काराची जोड आवश्यक : शेखर चरेगावकर