'खाकी'तील बापमाणूस! झुडपात सापडली नवजात मुलगी; पोलीस अधिकारी घेणार दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 04:24 PM2024-10-12T16:24:58+5:302024-10-12T16:31:26+5:30
मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून लोकांनी पाहिलं तेव्हा त्यांना मुलगी झुडपात पडलेली दिसली. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण होतं.
दुर्गा अष्टमीच्या दिवशी गाझियाबादच्या बेव सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील डासना येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोणीतरी एका नवजात मुलीला झुडपात सोडून निघून गेलं. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चिमुकलीचा जीव वाचवला. कौतुकास्पद बाब म्हणजे पोलीस अधिकारी पुष्पेंद्र चौधरी यांनी मुलीला दत्तक घेण्याचा मोठा निर्णय घेतला. मुलीला आपल्या कुटुंबाचा भाग बनवण्यासाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.
डासना परिसरातील इनायतपूर गावाजवळील राजवाहेवळील झुडपात ही मुलगी आढळून आली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून लोकांनी पाहिलं तेव्हा त्यांना मुलगी झुडपात पडलेली दिसली. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण होतं. यानंतर स्थानिक पोलिसांना मुलगी झुडपात असल्याची माहिती देण्यात आले. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि नंतर मुलीचं चेकअप करण्यासाठी तिला डासना सीएससी येथे नेलं. पोलिसांनी मुलीच्या घरच्यांचा शोधही सुरू केला मात्र कोणीही सापडलं नाही.
मुलीला दत्तक घेण्याची कल्पना पोलीस अधिकारी पुष्पेंद्र सिंह यांच्या मनात आली. पुष्पेंद्र सिंह हे त्यांची पत्नी राशी यांच्याशी याबाबत बोलले, त्यानंतर त्यांच्या पत्नीने देखील मुलगी दत्तक घेण्यास होकार दिला. "नवरात्रीसारख्या पवित्र प्रसंगी मुलगी घरी आली तर ते खूप शुभ होईल आणि यापेक्षा आनंदाची गोष्ट कोणती असू शकते" असं त्यांच्या पत्नीने म्हटलं. पुष्पेंद्र यांनी २०१८ मध्ये लग्न केलं आहे. मात्र त्यांना मूल नाही. पण आता या चिमुकलीमुळे त्यांचं कुटुंब आनंदात आहे.
या संपूर्ण प्रकरणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंकित चौहान यांनी सांगितलं की, ही मुलगी पोलिसांना झुडपात आढळून आली. पुष्पेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुलगी दत्तक घ्यायची आहे, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुष्पेंद्र सिंह म्हणतात की, ते आणि त्यांची पत्नी राशी दोघेही या मुलीला दत्तक घेण्यास उत्सुक आहेत. मुलगी दत्तक घेण्याची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आहे आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ते मुलगी दत्तक घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.