कोराेना महामारीवर वेगाने विजय मिळवता येईल -पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 07:07 AM2020-11-23T07:07:48+5:302020-11-23T07:08:14+5:30
“जी २० देशांच्या नेत्यांशी झालेली चर्चा खूप फलदायी होती. मोठ्या अर्थव्यवस्थेच्या देशांनी समन्वयाने काम केल्यास कोरोना महामारीतून वेगाने बाहेर पडता येईल.
नवी दिल्ली : जगातील मोठ्या अर्थव्यवस्थेच्या देशांतील समन्वयाच्या कामाने कोरोना महामारीवर वेगाने व खात्रीने विजय मिळवता येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. जी २० देशांच्या १५ व्या शिखर परिषदेला शनिवारी मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहिले त्यावेळी ते बोलत होते. परिषदेचे अध्यक्षस्थान सौदी अरेबियाकडे होते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आदी नेते कोरोना महामारीने घडवलेल्या जागतिक परिणामाची चर्चा करण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले होते.
“जी २० देशांच्या नेत्यांशी झालेली चर्चा खूप फलदायी होती. मोठ्या अर्थव्यवस्थेच्या देशांनी समन्वयाने काम केल्यास कोरोना महामारीतून वेगाने बाहेर पडता येईल. व्हर्चुअल शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल सौदी अरेबियाचे आभार,” असे मोदी यांनी ट्वीटवर म्हटले. मोदी यांनी मानवाच्या इतिहासाला कोरोना महामारीने महत्वाचे वळण दिले अशा शब्दांत वर्णन करून म्हटले की, दुसऱ्या महायुद्धानंतर जग सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड देत आहे.
४१ लाख ग्रामस्थांसाठी ‘हर घर नल योजना’
वाराणसी (उत्तर प्रदेश) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विंध्य प्रांतातील सोनभद्र आणि मिझार्पूर जिल्ह्यासाठी ‘हर घर नल योजना’ रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुरू करण्यात आली. यावेळी सोनभद्रमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. सोनभद्र आणि मिर्झापूर जिल्ह्यातील ४१ लाख ग्रामस्थांना या योजनेद्वारे पाणी दिले जाईल. यासाठी ५,५५५.३८ कोटी खर्च येणार आहे. विंध्याचल प्रांत हा नैसर्गिक स्रोतांनी विपूल असला तरी त्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यापासून दुर्लक्ष् केले गेले.