रेल्वे अपघाताला २ आठवडे उलटूनही चालक घरी परतला नाही; कुटुंबीय पाहतायत वाट...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 02:26 PM2023-06-18T14:26:50+5:302023-06-18T14:27:11+5:30
Odisha Train Accident : ओडिशात झालेल्या रेल्वे अपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं.
Odisha Tragedy : ओडिशात झालेल्या रेल्वेअपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. २९० नागरिकांना या भीषण अपघातात आपला जीव गमवावा लागला. या अपघातातील पीडितांच्या मदतीसाठी अनेकजण समोर येत आहेत. पण हा भीषण अपघात झालाच कसा? हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. अशातच अपघात स्थळापासून सुमारे १५० किमी अंतरावर कटक जिल्ह्यातील नाहरपाडा गावात एक कुटुंब आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत आहे.
खरं तर कोरोमंडल एक्स्प्रेसचे चालक गुणनिधी मोहंती यांचे हे गाव आहे. लक्षणीय बाब म्हणजे अपघाताला बराच काळ उलटला असला तरी मोहंती अद्याप घरी पोहचले नसल्याचे वृत्त हिंदुस्तान टाइम्सने दिले आहे. हिंदुस्तान टाइम्सने गुणनिधी यांचे वडील ८० वर्षीय बिष्णू चरण मोहंती यांच्या हवाल्याने सांगितले की, अपघातानंतर ते त्यांच्या मुलाशी बोलले देखील नाहीत. ते आपला मुलगा घरी येण्याची वाट पाहत आहेत. या दुर्घटनेला गावकरी त्यांच्या मुलाला जबाबदार मानतात, पण त्या संध्याकाळी काय घडले ते कसे सांगायचे?, असेही मोहंती यांच्या वडिलांनी सांगितले.
२ जून रोजी खरगपूरहून भुवनेश्वरला जाणारी कोरोमंडल एक्स्प्रेस ओडिशातील बालासोर येथील बहंगा बाजार स्टेशनच्या इथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. अपघातानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचा काही भाग रुळावरून घसरून दुसऱ्या मार्गावर पडला. अपघाताच्या वेळी गुणनिधी मोहंती कोरोमंडल एक्स्प्रेसमध्ये लोको पायलट होते.
२९० जण दगावले
२ जून रोजी संध्याकाळी ७ वाजता बालासोर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला. या अपघातात २९० जणांचा मृत्यू झाला तर १२०० हून अधिक जण जखमी झाले होते. अवघ्या विश्वाच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या या रेल्वे अपघातात तब्बल २९० जणांचा मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. या दुर्देवी घटनेनंतर ३ जून रोजी ओडिशात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता.