रुळावर परतली 'कोरोमंडल एक्सप्रेस', प्रवाशांच्या संमिश्र भावना, काहींनी देवाला सोबत आणले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 05:45 PM2023-06-07T17:45:12+5:302023-06-07T17:45:35+5:30
2 जून रोजी ज्या कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला, ती आज पुन्हा रुळावर परतली आहे.
Coromandal Train Express: ओडिशातील बालासोरमध्ये 2 जूनच्या सायंकाळी झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देशाला हादरुन सोडले. तो अपघात इतका भीषण होता की, रेल्वे पुन्हा रुळावर कधी येणार? असा प्रश्न पडला होता. पण, अखेर रुळांची दुरुस्ती होऊन गाड्या पुन्हा धावू लागल्या आहेत. आज(बुधवार) पश्चिम बंगालमधील शालीमार येथून कोरोमंडल एक्सप्रेसही तामिळनाडूतील चेन्नईकडे रवाना झाली.
ज्या कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झाला, ती आता पुन्हा रुळावर धावू लागली आहे. ट्रेनमध्येही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळतीये. कोरोमंडलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संमिश्र भावना आहेत. काही जण खूप घाबरले आहेत तर काही लोक म्हणतात की, त्यांचा रेल्वेवर विश्वास कायम आहे. ट्रेनमधून प्रवास करणारे काही लोक देवाच्या मूर्ती सोबत घेऊन येत आहेत.
तीन ट्रेनचा अपघात...
2 जून रोजी झालेल्या रेल्वे अपघातात 275 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले. आजही मृतांमधील अनेकांची ओळख पटलेली नाही. या अपघातामुळे अनेकांची घरे उघड्यावर पडली आहेत. यात अनेकजण अनाथ झाले, तर अनेकांनी आपले पाल्य गमावले. या अपघाताने अनेकांच्या मनात खोलवर जखम केली आहे.