८0 देशांत कोरोना; भारतात ३0 रुग्ण; अनेक कार्यक्रम रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 06:02 AM2020-03-06T06:02:02+5:302020-03-06T06:02:13+5:30
कोरोनाचा भारतीयांना संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू असले तरी अफवांमुळे लोक धास्तावून गेले आहेत.
नवी दिल्ली/मुंबई/पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग आता ८0 देशांत झाला असला तरी चीनमधील मृतांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. जगभरातील कोरोनाच्या बळींची संख्या ३२00 वर गेली असून, भारतात रुग्णांचा आकडा ३0 आहे. कोरोनाचा भारतीयांना संसर्ग होऊ नये, यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू असले तरी अफवांमुळे लोक धास्तावून गेले आहेत.
दिल्लीत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्राथमिक शाळांना ३१ मार्चपर्यंत सुटी देण्यात आली आहे. दिल्लीत व देशाच्या अन्य भागांतही होळीसह जवळपास सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द झाले आहेत.
देशातील अनेक सरकारी व खासगी कार्यालयांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचे उपाय योजले आहेत. संसदेत खा. नवनीत राणा गुरुवारी तोंडावर मास्क लावून आल्या होत्या, तर काही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हातमोजे घातले होते. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक जण मास्क घालून फिरताना दिसत आहेत. त्या विशिष्ट मास्कचा काळाबाजार सुरू असून, तो २५0 ते ५00 रुपयांना विकला जात आहे.
>यंदाची आयपीएल कोरोनामुळे रद्द?
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्याने २९ मार्चपासून सुरू होणाºया आयपीएलवर कोरोनाचे सावट असून ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या निमित्ताने देशभरातील स्टेडियमवर प्रचंड गर्दी होणार आहे. कोरोनाच्या दृष्टीने पुढचे १५-२० दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. अशा वेळी आयपीएलसाठी होणाºया गर्दीने अडचणी वाढू शकतात. त्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलली जाऊ शकते.
>लोकांनी घाबरू नये - मुख्यमंत्री
कोरोनाबाबत राज्य सरकारने पुरेशी
खबरदारी घेतली असून, लोकांनी घाबरू नये. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, मर्यादेत होळी साजरी करा, असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. कोरोना संसर्गाचा परिणाम आयटी क्षेत्रावरही दिसत आहे. पुण्यातील आयटी कंपन्यांनी कर्मचाºयांना घरून काम करण्यास सांगितले आहे.