कोरोनाचे ३.९२ लाख नवे रुग्ण; ३,६८९ मृत्यू, सक्रिय रुग्ण ३३ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 06:10 AM2021-05-03T06:10:15+5:302021-05-03T06:10:37+5:30
बरे होण्याची टक्केवारी ८१.७७ टक्के; उपचाराधीन रुग्ण १७ टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाची बाधा झालेले तीन लाख ९२ हजार ४८८ नवे रुग्ण रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत नोंद झाले. याच कालावधीत तीन हजार ६८९ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या दोन लाख १५ हजार ५४२ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी ९५ लाख ५७ हजार ४५७ झाली आहे. सध्या ३३ लाख ४९ हजार ६४४ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.
एकूण बाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांची टक्केवारी १७.१३ टक्के आहे, तर देश पातळीवर कोरोनातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ८१.७७ टक्क्यांवर आली आहे. एकूण बाधितांच्या संख्येच्या तुलनेत मृत्यूचा दर खाली येऊन १.१० टक्क्यांवर आला आहे. एक कोटी ५९ लाख ९२ हजार २७१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. भारतात गेल्या वर्षी सात ऑगस्ट रोजी कोरोना रुग्णांची संख्या २० लाखांच्या पुढे गेली होती. ३० लाख २३ ऑगस्ट, ५ सप्टेंबर रोजी ४० लाख आणि १६ सप्टेंबर रोजी ५० लाखांच्या पुढे गेली होती. २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख, २० नोव्हेंबर रोजी ९० लाख आणि १९ डिसेंबर रोजी कोटीच्या पुढे गेली होती.
एकूण मृत : राज्यनिहाय संख्या अशी-
महाराष्ट्र- ६९,६१५, दिल्ली- १६,५५९, कर्नाटक- १५,७९४, तामिळनाडू- १४,१९३, उत्तर प्रदेश- १२,८७४, पश्चिम बंगाल- ११,४४७, पंजाब- ९,१६० आणि छत्तीसगड- ८,८१०. एकूण मृतांपैकी ७० टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे एकापेक्षा जास्त आजारांमुळे झाले, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.