CoronaVirus News: मे अखेरपर्यंत ६४ लाख लोकांना होऊन गेला कोरोना; आयसीएमआरच्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 01:59 AM2020-09-12T01:59:01+5:302020-09-12T06:59:19+5:30
आयसीएमआरच्या सेरो सर्वेक्षणाचा निष्कर्ष
नवी दिल्ली : देशामध्ये मे महिन्यापर्यंत सुमारे ६४ लाख लोकांना कोरोना संसर्ग झाला मात्र त्यातील असंख्य रुग्णांचे निदान झाले नव्हते. यातून बरे झालेल्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या सेरोलॉजिकल सर्वेक्षणाच्या निष्कर्षात म्हटले आहे.
सर्वेक्षणात म्हटले आहे की...
मे महिन्यामध्ये कोरोनाचा एक रूग्ण जरी आढळून आला तरी वास्तवात सुमारे ८२ ते १३० जणांना बाधा झाली होती. परंतु त्यांचे निदान होऊ शकले नाही. हे सर्वेक्षण ११ मे ते ४ जून दरम्यान केले आहे. या काळात २८ हजार रुग्णांचे नमुने तपासले गेले. राष्ट्रीय स्तरावर सेरोचे प्रमाण मे महिन्यात ०.७३ टक्के इतके होते. कोरोना होऊन गेलेल्या पण त्याचे निदान न झालेल्या लोकांचे प्रमाण १८ ते ४५ वर्षे वयोगटामध्ये ४३.३ टक्के, ४६ ते ६० वर्षे वयोगटात ३९.५ टक्के व ६० वर्षे वयावरील लोकांमध्ये १७.२ टक्के इतके होते. मे महिन्यात साथीचा सुरुवातीचा टप्पा सुरू होता.
चाचण्या थांबल्याने निराश होऊ नका- जागतिक आरोग्य संघटना
जिनिव्हा : ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनिसा ही कंपनी तयार करत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या अल्पकाळासाठी थांबविण्यात आल्याने कोणीही निराश होण्याची आवश्यकता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.