कोरोनाने उडवला नोटांचाही रंग; सॅनिटायझर व इस्त्रीचा वापर केल्याचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 06:59 AM2021-06-03T06:59:41+5:302021-06-03T07:00:42+5:30
रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मागील दोन वर्षांत दोन हजारांच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण तब्बल ७५० पटींनी वाढले आहे.
नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे चलनी नोटांनाही मोठा फटका बसत असून, वारंवार सॅनिटाइझ केल्यामुळे, तसेच धुतल्यामुळे नोटांचा रंग उडत असल्याची माहिती समोर आली आहे.
रिझर्व्ह बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मागील दोन वर्षांत दोन हजारांच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण तब्बल ७५० पटींनी वाढले आहे. पाचशे आणि दोनशेच्या नोटांनाही चांगलाच फटका बसला आहे. त्या तुलनेत छोट्या नोटांना कमी फटका बसला आहे.
२०१८-१९ मध्ये दोन हजारांच्या ६ लाख नोटा नष्ट करण्यात आल्या होत्या. २०२०-२१ मध्ये ही संख्या तब्बल ४५.४८ कोटींवर पोहोचली. हे प्रमाण तब्ब्ल ७५० पट अधिक आहे. २०१८-१९ मध्ये दोनशेच्या केवळ १ लाख नोटा खराब झाल्या होत्या. ही संख्या २०२०-२१ मध्ये ११.८६ कोटी झाली. हे प्रमाण तब्बल १,१८६ पट अधिक आहे. पाचशेच्या नोटा खराब होण्याचे प्रमाण ४० पटींनी वाढले आहे.
छोट्या मूल्यांच्या नोटांत हे प्रमाण अर्ध्यापेक्षाही कमी आहे. नोटा खराब होण्यास कोरोना साथ जबाबदार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. कोरोना संक्रमणाच्या भीतीने लोक मोठ्या प्रमाणात नोटा सॅनिटाइझ करीत आहेत. ज्यांच्याकडे सॅनिटायझर नाही, ते लोक नोटा साबणाने धुऊन इस्त्री करीत आहेत. त्यामुळे नोटा खराब होत आहेत, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
नोटा नष्ट करण्यासंबंधीची आकडेवारी (संख्या लाखात)
नोट २०१८-१९ २०१९-२० २०२०-२१
२,००० ०६ १,७६८ ४,५४८
५०० १५४ १,६४५ ५,९०९
१०० ३७,९४५ ४४,७९३ ४२,४३३
५० ८,३५२ १९,०७० १२,७३८
२० ११,६२६ २१,९४८ १०,३२५
१० ६५,२३९ ५५,७४४ २१,९९९
५ ५९१ १,२४४ ४६४
२०० ०१ ३१८ १,१८६
(आकडे रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार)