कोरोनातही 7.3 टक्के वेतनवाढीचा अंदाज, ८७ टक्के कंपन्यांची पगारवाढीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2020 12:56 AM2020-11-05T00:56:06+5:302020-11-05T06:44:13+5:30
payment : व्यावसायिक सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘एओन’ने केलेल्या सर्वेक्षणात काही सकारात्मक मुद्दे मांडले आहे.
नवी दिल्ली : कोरोना महामारीने लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आणले. त्यात काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. नोकरदार वर्गाला यावर्षी ६.१ टक्के वेतनवाढ
मिळाली, तर २०२१ मध्ये सरासरी ७.३ टक्के वेतनवाढ मिळण्याचा अंदाज आहे.
व्यावसायिक सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘एओन’ने केलेल्या सर्वेक्षणात काही सकारात्मक मुद्दे मांडले आहे. कंपनीच्या अहवालानुसार कोरोनाच्या संकट काळातही देशातील अनेक कंपन्यांनी लवचिकता दाखविली आहे. सुमारे ७१ टक्के कंपन्यांनी २०२० मध्ये वेतनवाढ दिली होती. परंतु, २०२१ मध्ये यापेक्षा अधिक, म्हणजे ८७ टक्के कंपन्यांनी वेतनवाढ देण्याची तयारी दर्शविली आहे. भारतात यावर्षी सरासरी ६.१ टक्के वेतनवाढ राहिली आहे. गेल्या दशकातील ही नीचांकी वेतनवाढ राहिली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुढील वर्षी सरासरी ७.३ टक्के वाढ मिळू शकते. २००९मध्ये आलेल्या जागतिक मंदीच्या काळात सरासरी ६.३ टक्के वेतनवाढ मिळाली होती. कंपन्यांनी आपले कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये गुंतवणूक केली आहे. कोरोना संकटातही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांप्रति परिपक्वता दाखवल्याचे ‘एओन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन सेठी यांनी म्हटले आहे.
असे केले सर्वेक्षण
- २० औद्योगिक क्षेत्र
- १०५० कंपन्यांचा समावेश
- ७१ टक्के कंपन्यांनी दिली वेतनवाढ
- ४५ टक्के कंपन्यांकडून ५ ते १०% वेतनवाढ