आंध्र प्रदेशमध्ये फोटोग्राफर ठरला कोरोना ‘सुपर स्प्रेडर’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 05:16 AM2020-06-08T05:16:53+5:302020-06-08T05:17:01+5:30
मृत व्यक्ती एका हॉटेलमध्ये फोटोग्राफरचे काम करीत होती
काकीनाडा : आंध्र प्रदेशमध्ये काकीनाडापासून २0 किलोमीटरवर असलेले गोल्लाला ममीददा गाव हिरवागार परिसर आणि नारळाच्या बागांमध्ये विसावलेले शहरांच्या कोलाहलापासून दूर. परंतु इतके लहान असलेले गाव सध्या चर्चेत आहे कारण हे कोरोना प्रसाराचे हॉट स्पॉट ठरले आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील या एकट्या गावात कोरोनाचे ११६ रुग्ण आहेत. २० मे रोजी या गावातील एका ५३ वर्षीय व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले. या व्यक्तीच्या माध्यमातूनच कोरोना गावात पसरला असावा, असा अंदाज आहे.
मृत व्यक्ती एका हॉटेलमध्ये फोटोग्राफरचे काम करीत होती. एकूणच कामाच्या स्वरूपामुळे या व्यक्तीच्या माध्यमातून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संपर्कामुळे पेडापुडी मंडल, रामचंद्रपूरम, अनापर्ती, बिक्कावोलू आणि मंदेपेटा मंडल या गावांतील १५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रामचंद्रपूरममध्ये एका समारंभात फोटो काढत असताना या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असावी असा अंदाज आहे. एका संस्थेने भरविलेल्या मास्कवाटपाच्या कार्यक्रमातही ही व्यक्ती हजर होती. या व्यक्तीचा मुलगाही कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले होते. या मुलानेही त्याच दरम्यान काही मित्रांसोबत पार्टी केली होती. पूर्व गोदावरी जिल्ह्यात सध्या कोरोनाचे ३०० रुग्ण आहेत. या रुग्णांपैकी निम्मे रुग्ण गोल्लाला ममीददा गावातील त्या एका ‘सुपर स्प्रेडर’ रुग्णामुळे बाधित झाल्याचा अंदाज आहे. (वृत्तसंस्था)