शंख वाजवून कोरोनाला पळवा म्हणणाऱ्या भाजपा खासदाराला कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 03:57 PM2020-09-15T15:57:20+5:302020-09-15T16:00:06+5:30
केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अर्जुन मेघवाल यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी भाभीजी पापड खाण्याचा सल्ला दिला होता. तर, चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला या खासदारांनी दिला.
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील अनेक देशांकडून लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाला पराभूत करण्यासाठी भाजपाचे अनेक नेते वेगवेगळे दावे करताना दिसत आहेत. चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी दिला होता. मात्र, संसदेच्या अधिवेशनापूर्वीच झालेल्या चाचणीत हेच खासदार महाशय कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.
केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार अर्जुन मेघवाल यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी भाभीजी पापड खाण्याचा सल्ला दिला होता. तर, चिखलात अंघोळ केल्याने आणि शंख वाजविल्यामुळे कोरोनापासून बचाव करता येईल, असा सल्ला खासदार सुखबीरसिंह जौनपुरिया यांनी दिला होता. खासदारांचा हा सल्ला चर्चेचा विषय ठरला होता. खासदार सुखबीरसिंह यांचा या विधानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये, ते चिखलात अंघोळ करत शंख वाजवताना दिसले. तसेच, व्हिडिओमध्ये ते असेही म्हणत आहेत की, "कोरोना ज्या दिवशी सुरू झाला होता, त्या दिवशी मी आपल्याला प्रतिकारशक्ती वाढवण्यास सांगितले होते. ही औषधे खाल्ल्याने वाढणार नाही. आपल्याला नैसर्गिक मार्गाने प्रतिकारशक्ती मिळेल. तुम्ही फिरायला जा, पावसात जा, चिखलात बसा. शेतातही काम करा, पायी चालत जा आणि शंख वाजवा, या गोष्टी प्रतिकारशक्ती वाढते." मात्र, खासदार महाशयांचा हा दावा फोल ठरल्याचे सिद्ध झाले आहे.
संसदेचे पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली असून, त्या पार्श्वभूमीवर केलेल्या चाचणीत तब्बल 30 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे संसदेतील 50 पेक्षा जास्त कर्मचारीही कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेल्या खासदारांच्या नावांमध्ये भाजपा खासदार सुखबीरसिंह जौनापुरिया यांचाही समावेश आहे.
अधिवेशनाच्या अगोदर सर्वच खासदारांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यानुसार, खासदारांची चाचणी केली असता, त्यामध्ये तब्बल 30 खासदारांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर, तब्बल 50 पेक्षा जास्त कर्मचाऱ्या रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. ज्या खासदार आणि कर्मचाऱ्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, त्यांना विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात आले आहे, तसेच अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याचेही सूचवले आहे.