छत्तीसगडमध्ये मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट, 19 जण संक्रमित; दिल्ली-महाराष्ट्रचं टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:42 AM2023-04-04T01:42:21+5:302023-04-04T01:43:33+5:30
दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी तर छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहात एकाचवेळी तब्बल 19 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3,641 रुग्ण आढळले आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी तर छत्तीसगडमधील मुलींच्या वसतिगृहात एकाचवेळी तब्बल 19 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.
मुलींच्या वसतिगृहात कोरोना स्फोट -
माध्यमांतील वृत्तांनुसार, संबंधित वसतिगृहात एकाच वेळी 11 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आणखी काही विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. यात आणखी 8 मुलींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यानंतर एकूण आकडा 19 वर पोहोचला आहे. यानंतर सर्वच विद्यार्थिनींना वसतिगृहातच क्वारंटाइन करण्यात आले आहे. याच बरोबर, संक्रमित विद्यार्थिनींच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थिनींची मुलींच्या वसतिगृहात तपासणी केली जात आहे.
दिल्लीत, महाराष्ट्रातील रुग्णसंख्येत वाढ -
एकीकडे छत्तीसगडमध्ये कोरोना स्फोट झाला असतानाच, दुसरीकडे दिल्लीतही कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत 293 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, सध्या दिल्लीत संसर्गाचा दर 18 टक्क्यांच्याही पुढे गेला आहे. येथे 15 दिवसांत नव्या रुग्ण संख्येत 6 पट वाढ झाली आहे. तसेच रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या 12 पटीने वाढली आहे. याशिवाय, महाराष्ट्रातही कोरोनाचा वेग वाढला आहे. येथे गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 248 रुग्ण समोर आले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे.