Corona In Parliament: संसदेत कोरोनाचा विस्फोट! तब्बल ४०० हून अधिक जणांचा अहवाल 'पॉझिटिव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 11:50 PM2022-01-08T23:50:30+5:302022-01-08T23:58:52+5:30
दिल्लीत कोरोनाचा हाहाकार सुरू असून आता संक्रमणाची लाट देशाच्या संसदेतही पोहोचली आहे. ६ आणि ७ जानेवारी रोजी संसदेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.
नवी दिल्ली-
दिल्लीत कोरोनाचा हाहाकार सुरू असून आता संक्रमणाची लाट देशाच्या संसदेतही पोहोचली आहे. ६ आणि ७ जानेवारी रोजी संसदेत काम करणाऱ्या कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात एकूण ४०० हून अधिक जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.
संपूर्ण देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत देशात १,४१,९८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यासह देशातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ४ लाख ७२ हजार १६९ वर पोहोचली आहे. शुक्रवारी कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख १७ हजार १०० इतका होता. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या ११ दिवसांत कोरोनाच्या दैनंदिन आकडेवारीत तब्बल २१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तर दिल्लीत कोरोनामुळे आज ७ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
दिल्लीत सध्या सक्रिय रुग्णांचा आकडा ४८ हजार १७८ वर पोहोचला आहे. संसर्गात पुन्हा एकदा देशात महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे ४१ हजार ४३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे राज्यात आता निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.