तेलंगाणाच्या मेडिकल कॉलेजमध्ये कोरोना विस्फोट, 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 12:41 PM2021-12-06T12:41:53+5:302021-12-06T12:42:18+5:30
कॉलेज कॅम्पसमधील सर्व 1000 लोकांची कोरोना चाचणी घेण्यासठी आज विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हैदराबाद:तेलंगणा राज्याच्या करीम नगर जिल्ह्यातील चालमेडा आनंदा राव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. या कॉलेजमधील किमान 43 वैद्यकीय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आठवडाभरापूर्वीच महाविद्यालयाचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यामुळेच हा संसर्ग पसरल्याचा अंदाज आहे.
करीम नगर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जुवेरिया म्हणाले की, कॉलेजने वार्षिक कार्यरम साजरे करण्याबद्दल आणि एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी येणार असल्याची माहिती सरकारला दिली नव्हती. त्या सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेकांनी मास्कही घातले नव्हते. त्या कार्यक्रमामुळेच हा कोरोना पसरला असवा.
ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत कॉलेजमधील 200 लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. सोमवारी कॅम्पसमधील सर्व 1000 लोकांची चाचणी घेण्यासाठी एक विशेष शिबिर आयोजित केले जाईल. 13 विद्यार्थी शनिवारी पॉझिटिव्ह आढळले तर इतर 26 विद्यार्थी रविवारी पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे. सर्व विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची चाचणी घेतली जात असून स्वच्छता मोहीमही राबवली जात आहे.
11 जोखीम असलेल्या देशांमधून 979 जण हैदराबादमध्ये आले
परदेशातून हैदराबादमध्ये आलेल्या 13 प्रवाशांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली आहे. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात आले असून आज संध्याकाळपर्यंत निकाल येऊ शकतो. 11 जोखीम असलेल्या देशांमधून 979 आले आहेत. ज्या लोकांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, त्यांनाही 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास आणि आठव्या दिवशी कोरोना चाचणी करुन घेण्यास सांगण्यात आले आहे. तेलंगणाचे आरोग्य मंत्री हरीश राव यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंट लाइन वर्कर्स आणि रोगप्रतिकारक-संवेदनशील गटांना बूस्टर डोस देण्याचा विचार करावा असे आवाहन केले आहे.