Corona Cases in India: कोरोना वाढवतोय टेन्शन! देशात आज पुन्हा अडीच हजाराहून अधिक नवे रुग्ण, ३० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 09:52 AM2022-04-25T09:52:31+5:302022-04-25T09:53:03+5:30
Corona Cases in India: देशात कोरोना रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात २,५४१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
Corona Cases in India: देशात कोरोना रुग्णांचा आकडा आता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत देशात २,५४१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ३० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या भारतातील कोरोना संक्रमणाचा दर ०.८४ टक्के इतका आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ५२२ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत १,८६२ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
देशात कोरोना रुग्ण संख्येच्या वाढीमागे दिल्लीतील आकडेवारी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत १,०८३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या एकट्या दिल्लीत ३,९७५ सक्रिय रुग्ण आहेत. तर संक्रमणाचा दर ४.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे.
आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना विषाणूच्या काल ३,०२,११५ चाचण्या केल्या गेल्या. तर कालपर्यंत एकूण चाचण्यांचा आकडा तब्बल ८३,५०,१९,८१७ वर पोहोचला आहे.
कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत गेल्या काही दिवसांपासून लक्षणीयरित्या वाढ होत आहे. रविवारी देखील देशात २,५९३ नवे रुग्ण आढळून आले होते. तर ४४ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बुधवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. या बैठकीत कोरोना संसर्गाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण एक प्रेझन्टेशन सादर करणार आहेत.
देशातील कोरोना आकडेवारी
एकूण प्रकरणं- ४,३०,६०,०८६
सक्रिय रुग्ण- १६,५२२
एकूण बरे झालेले रुग्ण- ४,२५,२१,३४१
एकूण मृत्यू- ५,२२,२२३
एकूण लसीकरण- १,८७,७१,९५,७८१