कोरोनामुळे १० राज्यांचा नीट, जेईई घेण्यास प्रखर विरोध; सुप्रीम कोर्टात करणार फेरविचार याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 01:46 AM2020-08-27T01:46:39+5:302020-08-27T01:47:02+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी नीट, जेईई, वैद्यकीय व विधिसारख्या परीक्षा आॅनलाइन घेण्याची सूचनाही केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पुडुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनीही नीट, जेईई घेण्यास विरोध केला.
नवी दिल्ली : नीट (यूजी) व जेईई (मेन) या प्रवेश परीक्षा वेळेवरच होणार, असे केंद्राने बुधवारी पुन्हा स्पष्ट केले असले तरी कोरोनाच्या उद्रेकामुळे या काळात या परीक्षा घेण्यास १० राज्यांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंग यांनी विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्य सरकारांसोबत सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले.
कोरोनाचा उद्रेक, वाहतूक बंद, विद्यार्थी गावांमध्ये अडकलेले, परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडचणी आदी लक्षात घेऊन परीक्षा पुढे ढकलाव्यात, असा विरोधकांचा सूर आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, छत्तीसगढ, पुडुच्चेरी, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांचा परीक्षा आता घेण्यास विरोध असून, तमिळनाडूने आपल्यापुरती सूट मागितली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंह यांनी नीट, जेईई, वैद्यकीय व विधिसारख्या परीक्षा आॅनलाइन घेण्याची सूचनाही केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पुडुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनीही नीट, जेईई घेण्यास विरोध केला. परीक्षा पुढे ढकलाव्यात, यासाठी मी पंतप्रधानांना दोन वेळा पत्र लिहून विनंती केली. मात्र उपयोग झाला नाही, असे त्या म्हणाल्या. परीक्षा रद्द करण्याची मागणी महाराष्टÑाने प्रथमपासूनच केली आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करावा, असे सरकारने म्हटले आहे. परीक्षा पुढे ढकलून विद्यार्थ्यांच्या निवडीची पर्यायी व्यवस्था केंद्राने करावी, अशी मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलणार
कोरोनाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ही माहिती दिली. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल.
४ लाख प्रवेशपत्रे डाऊनलोड
एनटीएने परीक्षार्थींसाठी प्रवेशपत्रे आॅनलाइन उपलब्ध करून दिली आहेत. पहिल्या तीन तासांत तब्बल ४ लाख परीक्षार्थींनी प्रवेशपत्रे डाऊनलोड करून घेतली आहेत. नीटसाठी १५.९७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर जेईईसाठी ९.५३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.
नीट, जेईई ठरल्यावेळीच जेईई (मेन) १ ते ६ सप्टेंबर आणि नीट (यूजी) १३ सप्टेंबर रोजी ठरल्यावेळीच होणार आहेत, असे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केले. परीक्षा घेताना काटेकोर काळजी घेतली जाईल. केंद्रांची संख्या वाढवणे, एकाआड एक उमेदवाराची बैठक व्यवस्था, प्रत्येक खोलीत कमी उमेदवार अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत, असे एनटीएने सांगितले. केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनीही परीक्षा ठरल्यावेळीच होणार, असे बुधवारी स्पष्ट केले.