Children Corona Vaccination: आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू, 12 लाखांहून अधिक मुलांनी केली नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 12:19 PM2022-01-03T12:19:27+5:302022-01-03T12:19:35+5:30
Children Corona Vaccination: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी देशाला दिलेल्या संदेशात 15 ते 18 वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती.
नवी दिल्ली: 3 जानेवारी म्हणजेच आजपासून देशात 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोरोनाची लस मिळण्यास सुरुवात झाली आहे. रविवारपर्यंत लसीकरणासाठी CoWIN अॅपवर 12 लाखांहून अधिक नोंदणी करण्यात आली, तर 4.52 लाखांहून अधिक मुलांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले की, मुलांच्या लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर स्वतंत्र लाइन, वेगळी वेळ आणि स्वतंत्र लसीकरण पथक तयार करण्याचे प्रयत्न आहेत.
राज्यांना सूचना जारी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 27 डिसेंबर रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केवळ 15 ते 18 वयोगटातील मुलांनाच लसीकरण केले जाईल. मांडविया यांनी लसीकरण कार्यक्रम योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्यांचे आरोग्य मंत्री, मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याशी ऑनलाइन बैठक घेतली.
12 लाख नोंदणी
बालकांच्या लसीकरणाच्या नोंदणीचा कार्यक्रम शनिवारपासून सुरू झाला. सरकारने जारी केलेल्या सूचनांनुसार, कोविन अॅपवर आधीच तयार केलेले खाते किंवा नवीन खाते तयार करुन नोंदणी केली जाऊ शकते. याशिवाय लसीकरण केंद्रावर जाऊनही नोंदणी करता येणार होती. रविवारी रात्रीपर्यंत 15 ते 18 वयोगटातील 12 लाखांहू अधिक मुलांनी लसीसाठी नोंदणी केली आहे.
25 डिसेंबर रोजी पंतप्रधानांनी घोषणा केली होती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर रोजी देशाला दिलेल्या संदेशात 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी 3 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली होती. सध्या देशात 15-18 वयोगटातील मुलांची संख्या सुमारे 10 कोटी आहे. जगातील 30 पेक्षा जास्त देशांमध्ये मुलांना आधीच लसीकरण केले जात आहे.
मुलांसाठी लस महत्वाची
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, कोरोना लस मुलांना कोविड-19 ची लागण होण्यापासून रोखण्यास मदत करते.
कोरोना लस गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होणे, दीर्घकालीन आरोग्य समस्या आणि मुलांमधील मृत्यूचा धोका कमी करते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कोविड-19 च्या उच्च जोखीम गटातील मुलांसाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजेच लठ्ठपणा, मधुमेह किंवा दम्याने ग्रस्त मुले, ज्यांना कोविड-19 पासून गंभीर आजारी पडण्याचा सर्वाधिक धोका असतो, त्यांच्यासाठीही आवश्यक आहे.कोविड-19 ची जास्त लागण झालेल्या भागात राहणाऱ्या मुलांसाठीही लसीकरण आवश्यक आहे.