देशात काेराेना मृत्यूपंथाला; साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 08:30 AM2022-12-03T08:30:31+5:302022-12-03T08:31:28+5:30
साथ हद्दपार होण्याच्या मार्गावर, मात्र दुष्परिणामांचा तडाखा कायम, मेंदूच्या विकासाचा वेग वाढल्याने तरूणाईला अकाली वृद्धत्वाचा विळखा
लाेकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना आजार भारतासहित जगातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असतानाच त्या साथीने झालेल्या दुष्परिणामांतून लोकांची अद्याप सुटका झालेली नाही. कोरोना साथीमुळे निर्माण झालेल्या तणावामुळे अनेक किशोरवयीन मुले, युवकांच्या मेंदूचे वय वाढले असून त्यांना अकाली वृद्धत्व आले आहे. या बदलाचे भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात, असे एका संशोधनातून आढळून आले.
साथीच्या काळात अनेक प्रश्नांचे गुंते सोडविताना वाढलेल्या ताणतणावांचा किशोरवयीन मुले, युवकांच्या मनावर परिणाम झाला. ते आपल्या तारुण्यसुलभ भावना व चैतन्य हरवून बसले. या मुलांनी प्रौढ व्यक्तींप्रमाणे विचार करायला व वागायला सुरूवात केली. यासंदर्भात केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष ग्लोबल ओपन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. जगभरातून कोरोनाची रुग्णसंख्या उतरणीला लागलेली असताना हे नवे आजार लोकांपुढे अनेक समस्या निर्माण करीत आहेत.
देशात सर्वात कमी रुग्णांची नोंद
देशात एप्रिल
२०२० नंतर शुक्रवारी कोरोनाचे सर्वांत कमी
म्हणजे २७५ नवे रुग्ण आढळून आले. ६ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचे
४८९ रुग्ण आढळले होते. कोरोनाच्या घटलेल्या रुग्णसंख्येवरून तो आजार देशातून हद्दपार होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते.
सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४,६७२ वर आली आहे. कोरोनामुळे केरळ आणि छत्तीसगडमध्ये गेल्या २४ तासांत प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत मृतांची संख्या ५,३०,६२४ झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.८०%
भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.८० टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या लोकांची संख्या ४,४१,३७,६१७ वर पोहोचली आहे, तर मृत्यूदर १.१९ टक्के नोंदवला गेला आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी कोविड-१९ लसीकरण मोहिमेंतर्गत देशात आतापर्यंत लसींचे २१९.९३ कोटी डोस देण्यात आले आहेत.
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे संशोधन...
२०२० साली प्रौढ व्यक्तींना जाणवणाऱ्या तणावामध्ये त्याआधीच्या वर्षांच्या तुलनेत २५% वाढ झाली. कोरोनाने मानसिक ताणतणाव व आजारांत वाढ झाली.
अतिविचार, तणाव ठरले घातक
संशोधक इयान गोटलिब यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या आधी व साथीच्या काळात १६३ विद्यार्थ्यांच्या मेंदूचा एमआरआय काढण्यात आला होता. साथीतील ताणामुळे व अतिविचारामुळे मेंदूचा विकास होण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होऊ लागल्याचे या पाहणीतून निदर्शनास आले होते. तरुणवयात ही मुले अकाली वृद्ध झाल्याची चिन्हे आहेत.