कोरोना नक्कीच बरा होतो, 101 वर्षीय आजीबाईला रुग्णालयातून डिस्चार्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 12:49 PM2020-07-26T12:49:09+5:302020-07-26T12:49:45+5:30
मंगम्मा असे या 101 वर्षीय आजीबाईचे नाव असून 25 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. कोरोना रुग्णावर त्यांनी मात केली असून त्या आता कोरोनामुक्त असल्याचे डॉ. राम यांनी सांगितले.
बंगळुरू - देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तर, वैद्यकीय व्यवस्थापनामुळे मृत्युदरातही मोठी घट होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. तिरुपती येथे एका 101 वर्षीय आजीने कोरोनावर मात केली आहे. येथील श्री पद्मावती महिला रुग्णालयातून नुकताच त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.
मंगम्मा असे या 101 वर्षीय आजीबाईचे नाव असून 25 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. कोरोना रुग्णावर त्यांनी मात केली असून त्या आता कोरोनामुक्त असल्याचे डॉ. राम यांनी सांगितले. मंगम्मा यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर तिरुपती येथील श्री व्यंकटेश इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या श्री पद्मावती महिला रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांनी विशेष काळजी घेतली. त्यामुळे, काही दिवसांतच आजीबाईने कोरोनावर मात केली. कोरोनामुळे मृत्यू होतो, अशी भीती मनात बाळगणाऱ्यांसाठी मंगम्मा एक उदाहरण ठरल्या आहेत. कोरोना बरा होतो, त्याला घाबरायचं नाही, असा संदेशच मंगम्मा यांनी दिल्याचे डॉक्टरांनी म्हटले.
101-yr-old woman recovers from COVID-19 in Tirupati
— ANI Digital (@ani_digital) July 26, 2020
Read @ANI Story | https://t.co/NRyAc7FV9Fpic.twitter.com/3pBSWoEppv
दरम्यान, दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कर्नाटकच्या बेल्लारी जिल्ह्यात एका 100 वर्षीय आजीबाईंनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर मी रुग्णलयात दाखल होते. तेथे डॉक्टरांनी माझी चांगली देखभाल घेतली, तसेच मला दररोज सफरचंद, औषधं आणि इंजेक्शनही देण्यात आले. त्यामुळे, आता माझी तब्येत ठणठणीत असल्याचं या आजींनी म्हटलं. तसेच, कोरोना हा किरकोळ सर्दीचा आजार असल्याचंही हल्लाम्मा यांनी म्हटलंय.
कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच, राज्यात दिवसभरात ९ हजार २५१ नवीन बाधितांची नोंद झाली, तर २५७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख ६६ हजार ३६८ इतकी झाली आहे. तर बळींचा आकडा १३ हजार ३८९ झाला आहे. राज्यात शनिवारी ७ हजार २२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत २ लाख ७ हजार १९४ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ टक्के झाले आहे.