विशिष्ट प्रकारच्या यूव्ही किरणांमुळे नष्ट होतो कोरोना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2020 05:46 AM2020-09-21T05:46:49+5:302020-09-21T05:47:05+5:30
महत्त्वाचा शोध; जागा निर्जंतूक करण्यासाठी प्रभावी उपाय
वॉशिंग्टन : कोरोना प्रतिबंधक लस विकसित करण्याचे प्रयोग कधी यशस्वी होणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले असतानाच विशिष्ट प्रकारच्या अल्ट्राव्हायोलेट (यूव्ही) किरणांमुळे कोरोनाचा विषाणू नष्ट करता येतो असा महत्त्वपूर्ण शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.
कोरोना रुग्णाच्या उपचारात विशिष्ट प्रकारच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर केल्याने त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. सार्वजनिक ठिकाणे निर्जंतूक करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर उपयोगी ठरू शकतो असेही या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले आहे. अमेरिकन जर्नल आॅफ इन्फेक्शन कंट्रोल या नियतकालिकात या संशोधनाबद्दलचा लेख प्रकाशित झाला आहे.
त्यात म्हटले आहे की, २२२ एम-यूव्हीसी या किरणांद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट करता येतो तसेच या किरणांच्या वापरामुळे माणसाच्या त्वचेवरही विपरित परिणाम होत नाही. या विशिष्ट प्रकारच्या किरणांचा उपयोग याआधी वेगळ््या प्रकारचे कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी करण्यात आला होता. मात्र
सार्स-कोव्ह-२ प्रकारचे कोरोना
विषाणू नष्ट होतात की नाही याबाबत मात्र प्रयोग करण्यात आले नव्हते.
२२२ एनएम यूव्हीसी ही किरणे २५४ एनएम यूव्हीसी किरणांपेक्षा कमी हानीकारक आहेत.
घातक विषाणू व जंतू नष्ट करण्यासाठी २२२ एनएम यूव्हीसी किरणे उपयोगी आहेत. यासंदर्भात शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगात या किरणांमुळे सार्स-कोव्ह-२ या प्रकारातील कोरोना विषाणूंपैकी ९९.७ टक्के विषाणू नष्ट झाल्याचे आढळून आले. त्यामुळे कोरोना साथ नष्ट करण्यासाठी महत्त्वाचा उपाय सापडला असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला. या किरणांमुळे माणसाचा डोळा किंवा त्वचेला कोणतीही इजा होत नाही.
माणसांच्या पेशींवरही दुष्परिणाम नाही
माणसाच्या शरीरातील जिवंत पेशींवरही २२२ एनएम-यूव्हीसी किरणांचा दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे रुग्णालयांपासून अनेक ठिकाणी जागा निर्जंतूक करण्यासाठी या प्रकारच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा उपयोग भविष्यात होऊ शकतो असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.