कोरोना इफेक्ट : आंतरराष्ट्रीय प्रवास झाला स्वस्त; २५६ सीटच्या विमानात केवळ २५ प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 02:44 AM2020-03-08T02:44:23+5:302020-03-08T02:44:41+5:30
Corona Virus: कोरोनाच्या प्रसारानंतर आंतरराष्ट्रीय विमानांसाठी ही विलक्षण परिस्थिती निर्माण झाली आहे. तिकिटाचे दर एवढे कमी करूनही परिस्थितीत सुधारणा नाही.
मुंबई : मुंबई ते लंडन आणि रिटर्नचे विमानाचे तिकीट केवळ ४६०००? ही काही कल्पना नाही, तर वस्तुस्थिती आहे. ऑनलाईन सर्चमध्ये शुक्रवारी ही आकडेवारी दिसत होती. तुर्कीश एअरलाईनचे विमान इस्तांबूलमध्ये ७५ मिनिटांसाठी थांबले होते तेव्हा या एअरलाइन्सने ही ऑफर दिली होती. मार्चमध्ये मुंबई ते लंडन आणि रिटर्नचे नेहमीचे तिकीट ८० हजार रुपये आहे.
आपण दिल्ली ते न्यूयॉर्कचे तिकीट बुक करून दोन दिवसांत होळीसाठी पुन्हा भारतात परतू शकता आणि तेही केवळ ५८ हजार रुपयांत. एरव्ही याच मार्गासाठी हे भाडे ८० हजार रुपये आहे.
कोरोनाच्या प्रसारानंतर आंतरराष्ट्रीय विमानांसाठी ही विलक्षण परिस्थिती निर्माण झाली आहे. तिकिटाचे दर एवढे कमी करूनही परिस्थितीत सुधारणा नाही. या आठवड्यात एका विमानाने सिंगापूरसाठी उड्डाण केले तेव्हा २५६ सीटच्या या विमानात केवळ २५ प्रवासी होते. हीच परिस्थिती लंडन-मुंबई या विमानात होती. मुंबईत लँड झालेल्या या विमानात केवळ ६० प्रवासी होते. ९/११ नंतरच्या हल्ल्यानंतर गत दोन दशकांत प्रथमच आंतरराष्ट्रीय विमानांसाठी ही परिस्थिती ओढावली आहे. पूर्व आशियातील प्रवासाशिवाय पश्चिम आशियात म्हणजे दुबई आणि अबुधाबीसाठीही हा फटका बसला आहे. मुंबई आणि दिल्लीतील निवासी दुबई आणि अबुधाबीसाठी विकएंडचे रिटर्न तिकिट केवळ १२,२०० मध्ये घेऊ शकतात. मुंबईतून पॅरिससाठी ४० हजार, इस्तांबूलसाठी ४२ हजार, बहरीन ५९ हजार रुपये आकारण्यात येत आहेत.
इंडिगोने रिशेड्युलिंग शुल्क केले माफ
कोरोनामुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीनंतर ‘इंडिगो’ने ३१ मार्चपर्यंतच्या बुकींगवरील रिशेड्युलिंग शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. तथापि, कॅन्सलेशन शुल्क मात्र कायम राहणार आहे.
इंडिगोचे मुख्य वाणिज्य अधिकारी विलियम बोल्टर यांनी सांगितले की, काही प्रवाशांना सध्याच्या परिस्थितीतही प्रवास करावा लागत आहे, हे आम्ही समजू शकतो. आपली चिंता दूर करण्यासाठी आणि आपला प्रवास त्रासमुक्त करण्यासाठी आम्ही आगामी दोन आठवडे नॉर्मल चेंज फी माफ करत आहोत. तथापि, नंतरच्या तारखेत रिशेड्युलिंग केल्यास भाडेदरातील फरक मात्र प्रवाशांना नियमानुसार द्यावा लागेल. प्रवाशांनी तीन दिवस अगोदर एअरलाइनला सूचना करायला हवी.