Corona Guideline : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेनं घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 04:46 PM2022-05-11T16:46:56+5:302022-05-11T16:47:16+5:30
देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यामुळे रेल्वे पुन्हा एकदा कोरोना प्रोटोकॉल नियमांच्या पालनासंदर्भात निर्णय घेत आहे.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या मंडळींना आता पुन्हा एकदा कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे. कोरोना संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता, रेल्वेने (Indian Railways) प्रवासादरम्यान पुन्हा एकदा मास्कचा वापर अनिवार्य केला आहे. रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक पॅसेंजर नीरज शर्मा यांनी सर्व झोनच्या चीफ कमर्शियल मॅनेजर्सना (CCM) पत्र पाठवून, यासंदर्भात सूचना दिली आहे. "रेल्वे प्रवासादरम्यान मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोरोना प्रोटोकॉलचे पान करण्यात यावे," असे या पत्राक म्हणण्यात आले आहे.
मास्कचा वापर न करणाऱ्यांना भरावा लागेल दंड -
यासंदर्भात रेल्वेने म्हटले आहे, की केंद्रीय गृह मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने कोरोनासंदर्भात, 22 मार्च रोजी जारी केलेल्या एसओपीचे पालन करण्यात यावे. तसेच, विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते. रेल्वे बोर्डाने सर्व गाड्या आणि स्थानक परिसरांतही प्रवाशांना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मास्क घालण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे.
तत्पूर्वी, कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर, रेल्वेने मास्क वापरासंदर्भात प्रवाशांना सूट दिली होती. यानंतर, प्रवाशांना विनामास्कदेखील रेल्वेने प्रवास करता येत होता. तसेच रेल्वेमध्ये पूर्वी प्रमाणेच पॅनट्री आणि बेडिंग देण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. यामुळे रेल्वे पुन्हा एकदा कोरोना प्रोटोकॉल नियमांच्या पालनासंदर्भात निर्णय घेत आहे. याचाच एक भाग म्हणून आता पुन्हा एकदा रेल्वे प्रवासादरम्यान मास्क अनिवार्य करण्यात आले आहे.