कोरोनाचा कहर, देशात एकाच दिवसांत आढळले तब्बल 49, 310 रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 12:41 PM2020-07-25T12:41:34+5:302020-07-25T12:42:02+5:30
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवाडीनुसार देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 740 लोकांचा मृत्यू झाला आहे
नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एकाच दिवसात तब्बल 49,310 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंतचा एका दिवसांतील रुग्णावाढीचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या रुग्णांसह देशातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 12 लाख 87 हजार 945 पर्यंत पोहोचली आहे. त्यामध्ये, 8 लाख 17 हजार 208 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जारी केलेल्या आकडेवाडीनुसार देशात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तब्बल 740 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होऊन आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 30,601 एवढी झाली आहे. सद्यस्थितीत देशात 4 लाख 40 हजार 135 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, आत्तापर्यंत 63.45 टक्के रुग्ण बरो होऊन घरी परतले आहेत. त्यामध्ये विदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
दरम्यान, राज्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे ५,७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यंत एकूण १ लाख ९९ हजार ९६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या ९,६१५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या १ लाख ४३ हजार ७१४ रुग्णांवर (अॅक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. आतापर्यंत कोरोनापाठविलेल्या १७ लाख ८७ हजार ३०६ नमुन्यांपैकी ३ लाख ५७ हजार ११७ नमुने पॉझिटिव्ह (१९.९८ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ८८ हजार ९७६ लोक होम क्वारंटाइन असून ४५ हजार ८३८ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात शुक्रवारी कोरोनामुळे २७८ मृत्यू झाल्याची नोंद झाली असून सध्या मृत्युदर ३.६८ टक्के आहे.