कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात ? गेल्या चोवीस तासात देशात 805 रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:18 PM2021-10-29T12:18:39+5:302021-10-29T12:19:02+5:30
कोरोनाची नवीन प्रकरणे कमी झाली आहेत, परंतु धोका अद्याप टळलेला नाही. देशात दररोज 14 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत.
नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. पण, मृतांच्या आकड्याने चिंता वाढवली आहे. नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीने भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशभरात 805 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर 14,348 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3,42,46,157 झाली आहे. तसेच, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,61,334 वर आहे.
#COVID19 | Of the 14,348 new infections and 805 deaths reported in India in the last 24 hours, Kerala reported 7,838 new cases and 90 deaths.
— ANI (@ANI) October 29, 2021
एका दिवसात 805 लोकांचा मृत्यू झाला
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना संसर्गामुळे देशभरात 805 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता एकूण मृतांची संख्या 4,57,191 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, कोरोना रुग्णांची दैनंदिन प्रकरणे सलग 35 व्या दिवशी 30,000 पेक्षा कमी आहेत आणि सलग 124 व्या दिवशी 50,000 पेक्षा कमी आहेत.
साथीचा धोका कायम
आकडेवारीनुसार, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.47 टक्के आहे, जी मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे. कोरोनाचा धोका अजूनही संपलेला नाही. कोविड-19 मधून बरे होण्याचा दर 98.19 टक्के आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी 7 ऑगस्ट रोजी देशातील संक्रमित लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. त्याच वेळी, संसर्गाची एकूण प्रकरणे 16 सप्टेंबर रोजी 50 लाख, 28 सप्टेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांवर गेली होती. देशात 19 डिसेंबर रोजी ही प्रकरणे एक कोटीच्या पुढे गेली होती, तर यावर्षी 4 मे रोजी दोन कोटी आणि 23 जून रोजी ती तीन कोटींच्या पुढे गेली होती.