CoronaVirus News: कोरोनाच्या संसर्गाचा आर्थिक वृद्धीला धोका; वित्त मंत्रालयाचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 04:26 AM2020-10-06T04:26:40+5:302020-10-06T04:27:08+5:30
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर लॉकडाऊन लागू केल्यामुळे एप्रिल-जूनचा वृद्धिदर २३.९ टक्क्यांनी घसरला होता.
नवी दिल्ली : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणेने गती पकडली आहे. तथापि, कोरोना विषाणूच्या साथीचा प्रसारही सातत्याने होत असल्यामुळे आर्थिक वृद्धीला धोका आहे, असे वित्त मंत्रालयाने सप्टेंबरसाठी जारी केलेल्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे.
यासंबंधीच्या अहवालात म्हटले आहे की, भारतात अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू आहे. दिवसागणिक नवनवी क्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणामही दिसून येत आहे. सर्वच क्षेत्रात चांगली वाढ दिसून येत आहे. काही क्षेत्रांतील वाढ तर मागील वर्षापेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले आहे. बिगर-मेट्रो शहरे आणि ग्रामीण भागात कोरोची वाढती साथ आणि वस्तूंच्या वाढत्या किमती असे अडथळे असतानाही ही वाढ दिसून येत आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर लॉकडाऊन लागू केल्यामुळे एप्रिल-जूनचा वृद्धिदर २३.९ टक्क्यांनी घसरला होता. आॅगस्टच्या मासिक आढाव्यात वित्त मंत्रालयाने ही माहिती जारी केली होती. साथीचा मुकाबला करण्यासाठी सरकारने अनेक धोरणात्मक उपाय योजले आहेत. अनेक संरचनात्मक सुधारणा हाती घेतल्या आहेत. अर्थव्यवस्थेचे मूलभूत आधार त्यामुळे मजबूत होतील. मजबूत आणि शाश्वत दीर्घकालीन वृद्धीसाठी त्याचा फायदा होईल.
सूत्रांनी सांगितले की, १७ ते ३0 सप्टेंबर या काळातील आकडेवारी-नुसार, भारताने कोरोनाचा सर्वोच्च बाधाकाळ ओलांडला असावा, असे मानले जात आहे.
मध्यमकालीन वृद्धीदराला धोका कायम
सप्टेंबरच्या आढाव्यात वित्त मंत्रालयाने म्हटले की, कोरोना साथीच्या सर्वोच्च बाधाकाळाचा टप्पा भारताने ओलांडला असावा, असे बोलले जात आहे. तथापि, कोरोना साथ अजूनही पसरत आहे. अल्पकालीन आणि मध्यमकालीन वृद्धीदराला असलेला धोका कायम आहे.