देशात ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक ॲंटिबॉडीज आढळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 05:48 AM2021-07-21T05:48:18+5:302021-07-21T05:49:00+5:30
सिरो सर्वेक्षण; ४० कोटी जनता अजूनही विषाणूपासून असुरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात सहा वर्षांवरील वयाच्या ६७.६ टक्के नागरिकांमध्ये कोरोना विषाणूरोधी ॲंटिबॉडीज निर्माण झाल्याचे चौथ्या राष्ट्रीय सिरो सर्वेक्षणात आढळल्याची माहिती ‘आयसीएमआर’ने दिली. ४० टक्के जनता अजूनही असुरक्षित आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे ‘आयसीएमआर’ने म्हटले.
२१ राज्यांमधील ७० जिल्ह्यांत जून व जुलैमध्ये चौथे राष्ट्रीय सिरो सर्वेक्षण केले. त्यात २८,९७५ नागरिक व ७,२५२ आरोग्य कर्मचारी सहभागी होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात सहभागी झालेल्या ८५ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ॲंटिबॉडीज निर्माण झाल्या आहेत. मात्र, १० टक्के जणांनी अजूनही लस घेतली नसल्याने काळजी घ्यावी लागेल. धार्मिक, राजकीय व इतर कार्यक्रमांना लोकांनी गर्दी करणे टाळायला हवे, असा सल्ला ‘आयसीएमआर’ने दिला आहे.
बैठकीस विरोधी पक्ष गैरहजर
कोरोना महामारीच्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातर्फे बोलाविण्यात आलेल्या बैठकीला कॉंग्रेस, ‘आप’, राजद तसेच डाव्या पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित राहण्याचे टाळले. संसदेतील प्रमुख नेत्यांसाठी ही बैठक बोलाविण्यात आली होती.
प्राथमिक शाळा सर्वप्रथम उघडा
लहान मुलांमध्ये विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिकार शक्ती चांगली असते. त्यामुळे शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण झाल्यास प्राथमिक शाळा सर्वप्रथम सुरू करण्याचा विचार करावा, असा सल्ला ‘आयसीएमआर’ने दिला आहे.
केंद्राने कोरोना बळींचे आकडे लपविले नाही
केंद्र सरकारने कोणत्याही राज्यांना मृत्यूचे आकडे किंवा रुग्णसंख्या कमी दाखविण्याच्या सूचना केलेल्या नव्हत्या, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी राज्यसभेत स्पष्ट केले. यावरील चर्चेला दिलेल्या उत्तरात ते म्हणाले, की राज्य सरकारकडून मिळणारी आकडेवारी केंद्राकडून एकत्र करुन प्रसिद्ध केली जाते. केंद्राने कुठलेही आकडे लपिवलेले नाहीत. तर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, असेही आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.