देशात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; दोन हजार नवे रुग्ण; उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांत मास्क सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 11:00 AM2022-04-19T11:00:59+5:302022-04-19T11:01:58+5:30
उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ११५४२वर आली आहे. गेल्या चोवीस तासांत २१४ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : कोरोना आता नावापुरता शिल्लक आहे अशा थाटात सर्वत्र गर्दी करून वावरणाऱ्या नागरिकांनी आता सावध होण्याची गरज आहे. देशात दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले असून, गेल्या चोवीस तासांत नवे २१८३ नवे रुग्ण आढळले आहेत. उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांत मास्क वापरणे पुन्हा सक्तीचे करण्यात आले आहे.
- उपचाराधीन रुग्णांची संख्या घटून ११५४२वर आली आहे. गेल्या चोवीस तासांत २१४ जणांचा मृत्यू झाला आहे.
उत्तर प्रदेश -
नॅशनल कॅपिटल रिजन (एनसीआर)मधील गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, हापूर, मेरठ, बुलंदशहर, बागपत हे सहा व लखनऊ अशा ७ जिल्ह्यांत मास्क वापरणे सरकारने सोमवारपासून बंधनकारक केले.
हरयाणा -
गुरुग्राम, फरिदाबाद, सोनिपत, झज्जर या जिल्ह्यांमध्ये मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. सोमवारी २३४ नवे रुग्ण आढळले.
९०% काेराेना रुग्णवाढ एकाच दिवसात
- देशात १६ एप्रिलपेक्षा १७ एप्रिलला कोरो ना रुग्णांच्या संख्येत सुमारे ९०% वाढ झाली.
- याच प्रमाणात रुग्ण संख्या वाढत राहिली तर शिथिल केलेले कोरोना निर्बंध पुन्हा लागू करावे लागतील अशी चिन्हे आहेत. केंद्र व राज्य सरकारे कोरोना स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
ओमायक्रॉनने मुलांच्या आरोग्याला धोका
- ओमायक्रॉनमुळे लहान मुलांमध्ये श्वसननलिकेच्या वरच्या भागातील संसर्गाचे (यूएआय) विकार उद्भवू शकतात.
- त्यामुळे त्यांना हृदयविकार, तसेच इतर आजारांचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे असे कोलोरॅडो विद्यापीठ, स्टोनी ब्रूक विद्यापीठाने केलेल्या संयुक्त पाहणीत आढळून आले आहे.