Lockdown : ४७ दिवस त्याच्यासाठी ट्रकच बनलं घर; कायम लक्षात राहील 'असा' प्रसंग !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 05:19 PM2020-05-12T17:19:33+5:302020-05-12T17:19:58+5:30
जेव्हा लॉकडाऊन संपायचे दिवस जवळ यायचे तेव्हा लॉकडाऊन पुन्हा वाढल्याच्या बातम्या यायच्या. जसजसा लॉकडाऊन वाढत गेला माझ्यासाठी तो अधिक कठीण बनत गेल्याचे सुनील सांगतो.
कोरोना महामारीशी मात करण्यासाठी हा लॉकडाऊन गरजेचा आहे, पण यामुळे अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. सर्वात जास्त त्रास मजुरांना सोसावा लागत आहे. कोणाला वेळेवर अन्न मिळत नाही आहे, तर कोणी आपल्या कुटुंबापासून दूर अडकून पडला आहे. त्यांची व्यथा एकणारा कोणीच नाही. देशात तिस-या टप्प्यातील लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर मजुरांनी आहे त्या परिस्थिती आपल्या गावी जाण्यासाठी पदयात्रा करण्याचा पर्याय अवलंबला तर काहींनी मात्र आहे, त्याच ठिकाणी राहून परिस्थिती पूर्ववत होण्याची वाट पाहत आहेत. लॉकडाऊनदरम्यान अनेकांचे हाल होत आहेत. अशात एक ट्रक ड्राव्हरदेखील जवळपास ४७ दिवस एका ट्रकमध्येच अडकून पडला होता. ४७ दिवस ट्रकमध्ये काढल्यानंतर तो कसाबसा घरी पोहोचला घरी असूनही त्याला तो ट्रकमध्येच अडकून असल्याचा भास होतो.
सुनील कुमार असे या ट्रक ड्रायव्हरचे नाव आहे. तो दिल्लीतल्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीत गेल्या सहा वर्षांपासून काम करतो. लॉकडाऊनच्या काळात सुनील राजस्थान सीमेजवळ त्याच्या ट्रकमध्येच अडकला होता. लॉकडाऊनमधील त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष आठवताना सुनीलने सांगितले की, “२२ मार्चला दिल्लीहून हैदराबादला जाण्यासाठी निघालो. त्यानंतर मी दिल्ली राजस्थान सीमेजवळ असलेल्या शाहपुरा या ठिकाणी २३ मार्चला पोहोचलो. मात्र तोपर्यंत लॉकडाऊन सुरु झाला होता. खबरदारी म्हणून मला राजास्थान पोलिसांनी पुढे जाऊ दिले नाही आणि दिल्ली पोलिसांनी मागे येऊ दिले नाही. त्यामुळे कुठेही जाण्यासाठी मार्गच नव्हता. शेवटी ट्रकमध्येच मुक्काम करायचा ठरविले. ट्रकने या काळात मोठा आधार दिल्याचे तो सांगतो. ट्रकमध्ये काही दिवसांचे धान्य आणि स्टोव्ह ठेवलेला असतो. त्या आधारावर काही दिवस ट्रकमध्ये काढले. मात्र नंतर मला किराणा दुकान गाठून तिथून सामान आणून अन्न शिजवावे लागत असे.
जेव्हा लॉकडाऊन संपायचे दिवस जवळ यायचे तेव्हा लॉकडाऊन पुन्हा वाढल्याच्या बातम्या यायच्या. जसजसा लॉकडाऊन वाढत गेला माझ्यासाठी तो अधिक कठीण बनत गेल्याचे सुनील सांगतो. नेहमी वाटायचे आज लॉकडाऊन संपेल, उद्या संपेल आणि मी माझ्या घरी पोहोचेन, कुटुंबाला भेटेल पण लॉकडाऊन आणखीन वाढत गेला. तो काळ खूप खडतर होता कधीच विसरू शकणार नाही असा तो लॉकडाऊन नेहमी स्मरणात राहणार असल्याचे सुनील सांगतो.