Coronavirus : धक्कादायक! कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 08:48 AM2020-03-31T08:48:36+5:302020-03-31T09:22:59+5:30
Coronavirus : पोलिसांनी सातही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून गावात चौकशी करण्यात येत आहे.
सीतामढी - भारतातही कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही 1000 हून अधिक झाली असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांनी काम नसल्याने आपल्या गावी पायी जाण्याचा प्रवास सुरू केला आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या दोन संशयितांची माहिती प्रशासनाला दिली म्हणून एकाची हत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचे दोन संशयित महाराष्ट्रातूनबिहारच्या सीतामढी जिल्ह्यात आपल्या घरी परतले होते. प्रशासनाला त्यांची माहिती देणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. प्रशासनाला माहिती दिली म्हणून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीतामढी जिल्ह्यातील मधोल गावातील एका कुटुंबातील दोन जण महाराष्ट्रातून घरी परतले होते. या दोघांची माहिती गावातील बबलू कुमार या तरुणाने कोरोना हेल्पलाईनला फोन करून दिली होती.
बबलूने कोरोना संशयितांची माहिती दिली म्हणून ते दोघेही संतापले. आरोग्य विभागाला चाचणीसाठी नमुने दिल्यानंतर त्यांनी कुटुंबातील इतर पाच जणांच्या मदतीने बबलूला बेदम मारहाण केली. या मारहाणीत बबलूचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हत्येप्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलिसांनी सातही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून गावात चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बिहार सरकारने नागरिकांना इतर राज्यांमधून गावामध्ये आलेल्या नागरिकांची माहिती ही हेल्पलाइन सेंटर आणि प्रशासनाला द्यावी. यामुळे कोरोना संशयितांची तपासणी करण्यात येईल असं आवाहन केलं आहे. मात्र माहिती देणाऱ्यांबाबत सरकारने काहीच स्पष्ट केलेलं नसल्याने इतरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 37 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरातील कोरोनाबधितांची संख्या 7 लाख 84 हजारांपर्यंत पोहोचली आहे. कोरोनामुळे अमेरिका, इटली, स्पेनसह इतर युरोपियन देशात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
coronavirus : जगभरात कोरोनामुळे 37 हजार जण मृत्युमुखी, अमेरिका, इटलीमध्ये भीषण परिस्थिती
Coronavirus:...म्हणून पाक पंतप्रधान इमरान खान यांनी केला नरेंद्र मोदींचा उल्लेख; लॉकडाऊनचा विरोध
CoronaVirus : तीन दिवसांत तयार होणार १०० बेड असणारी 'कोरोना केअर ट्रेन'