सर्वच देशांत कोरोना रुग्णवाढ; भारतात ३६० ओमायक्रॉन बाधित, १० राज्यांत रात्रीची संचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 05:57 AM2021-12-25T05:57:38+5:302021-12-25T05:58:41+5:30
ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या प्रारंभी कळस गाठू शकते, असे भाकीत करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत चवथ्यांदा मोठी वाढ होणार आहे. यावेळी त्यासाठी ओमायक्रॉन हा नवा विषाणू कारणीभूत ठरणार आहे असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या ३६० वर पोहोचली आहे. केरळ, मिझोराममध्ये कोरोनाचा प्रसार मोठा असून त्यामुळे चिंता वाढली आहे.
यासंदर्भात केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, देशात अद्यापही डेल्टा विषाणूचाच अधिक प्रसार आहे. मात्र ओमायक्रॉनचे रुग्ण दिवसागणिक वाढत असून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशातील ३६० ओमायक्राॅन रुग्णांपैकी १८३ जणांच्या माहितीचे सखोल विश्लेषण करण्यात आले. त्यातील ९१ टक्के लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते तर १२१ जणांनी विदेशवारी केली होती.
जगात गेल्या चाैथ्यांदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून संसर्गाचा एकूण दर ६.१ टक्के आहे. भारतात केरळ व मिझोरामध्ये कोरोना संसर्गाचा वेगाने प्रसार होत आहे. २० जिल्ह्यांमध्ये संसर्गदर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. त्यामुळे लाेकांनी ख्रिसमस व नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांत व त्यानंतरही नियम काटेकोर पालन करावे, असे सरकारने म्हटले आहे.
धारावीत आढळले कोरोनाचे ६ रुग्ण
धारावीत शुक्रवारी सहा कोरोना रुग्णांची नोंद झाली. येथील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ७ हजार १८८ एवढा आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे. दादर येथील गोखले रोडवरील लाल वैद्यकीय प्रयोगशाळेतील १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई महापालिकेने ही प्रयोगशाळा सील केली.
दहा राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी
- ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातसहित १० राज्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
- ख्रिसमस, नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवरही काही राज्यांनी निर्बंध आणले आहेत.
२४ तासांत ३७४ मृत्यू
देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे ६,६५० नवे रुग्ण सापडले व ३७४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण आकडा ३ कोटी ४७ लाख ७२, ६२६ झाला आहे. उपचार घेणाऱ्यांची आकडेवारी ७७,५१६ आहे. या संसर्गाने आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या ४ लाख ७९,१३३ वर पोहोचली आहे.
फेब्रुवारीच्या प्रारंभी गाठणार कळस?
ओमायक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या प्रारंभी कळस गाठू शकते, असे भाकीत आयआयटी कानपूरच्या संशोधकांनी केले आहे.