Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाच्या JN.1 नवीन व्हेरिएंटचे 109 रुग्ण; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 05:27 PM2023-12-27T17:27:13+5:302023-12-27T17:55:36+5:30
Corona Virus : JN.1 सब व्हेरिएंट सर्वप्रथम ऑगस्टमध्ये ओळखला गेला. हा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2.86 पासून तयार झाला आहे.
देशात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोविड-19 चे 529 नवीन रुग्ण आढळले आहेत. आता देशभरात एक्टिव्ह रुग्णांची संख्या 4,093 झाली आहे. मंत्रालयाने सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन रुग्ण कर्नाटकातील तर एक रुग्ण गुजरातचा आहे.
दरम्यान, कोरोनाचा सब व्हेरिएंट JN.1 च्या 40 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 26 डिसेंबरपर्यंत देशभरातील नवीन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 109 वर पोहोचली होती. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीत असं म्हटलं आहे की, गुजरातमध्ये 36, कर्नाटकात 34 आणि गोव्यात 14, महाराष्ट्रात 9, केरळमध्ये 6, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 4 आणि तेलंगणामध्ये 2 रुग्ण आढळले आहेत. सब व्हेरिएंटचे रुग्ण सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत.
JN.1 सब व्हेरिएंट सर्वप्रथम ऑगस्टमध्ये ओळखला गेला. हा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2.86 पासून तयार झाला आहे. 2022 च्या सुरुवातीला, BA.2.86 हे कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण होते. BA.2.86 मोठ्या प्रमाणावर पसरला नाही, परंतु तज्ञांची चिंती वाढली कारण BA.2.86 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये अतिरिक्त म्यूटेशन्स होते आणि तशाच प्रकारे JN.1 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये अतिरिक्त म्यूटेशन्स आहेत.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक स्तरावर रुग्णांमध्ये झालेली वाढ हे सूचित करते की JN.1 – Omicron चा सब व्हेरिएंट आहे जो मजबूत प्रतिकारशक्ती असलेल्यांना देखील सहजपणे संक्रमित करू शकतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने याचे वर्णन यूएसमध्ये सर्वात वेगाने वाढणारा व्हेरिएंट म्हणून केलं आहे.