कोरोनाचा नवीन व्हेरिएंट किती धोकादायक? पुन्हा व्हॅक्सीन घेण्याची गरज? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 09:43 PM2023-12-18T21:43:05+5:302023-12-18T21:43:16+5:30
भारतात कोरोनाचा नवीन JN.1 व्हेरिएंट आढळल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.
Corona New Varient: कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट(JN.1) आल्याने चिंता वाढली आहे. तज्ज्ञांची टीम या नवीन व्हेरिएंटवर गांभीर्याने लक्ष ठेवून आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या व्हेरिअंटमुळे देशात आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही सोमवारी हेल्थ अॅडव्हायजरी जारी केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, JN.1 व्हेरिएंट कोरोनाच्या BA.2.86 चे अपडेटेड व्हर्जन आहे.
दरम्यान, लसीचे दोन डोस आणि बूस्टर डोस घेऊनही कोव्हिडचा हा नवीन व्हेरिएंट हल्ला करू शकतो का? लसीचा आणखी एक डोस घ्यावा लागेल का? मास्क वापरणे पुरेसे ठरेल का? असे प्रश्न लोकांच्या मनात येऊ लागले आहेत. कोरोना काळात कोव्हिड प्रकरणांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने स्थापन केलेल्या टीमचे सदस्य डॉ. एनके अरोरा यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, “हा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचाच एक व्हेरिएंट असल्याचे समोर आले आहे. जीनोम सिक्वेन्सिंगमुळे विषाणू किती धोकादायक आहे, हे कळते. ओमायक्रॉन भारतात फार धोकादायक असल्याचे सिद्ध झालेले नाही.
कोरोनादरम्यान दिल्लीतील सर्वात मोठ्या कोव्हिड रुग्णालयांपैकी एक असलेल्या एलएनजेपीच्या पल्मोनरी विभागाचे एचओडी डॉ. नरेश कुमार सांगतात की, "सध्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये आढळणारा विषाणू सामान्य विषाणू आहेत. पॅरायन्फ्लुएंझा विषाणू आणि रायनोव्हायरस या मोसमात आढळतात. या विषाणूला फार घाबरण्याची गरज नाही, पण तशी परिस्थिती उद्धभवली, तर यंत्रणा तयार असेल."
WHO काय म्हणाले?
डब्ल्यूएचओच्या मते या व्हेरिएंटच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. जीवितहानी होण्याचा धोकाही कमी असतो. रुग्णांना तीन ते पाच दिवस सामान्य ताप आणि सर्दीसारखी लक्षणे जाणवू शकतात. कोरोनाची लस प्रत्येक व्हेरिएंटसाठी प्रभावी ठरली आहे. काही प्रकरणांमध्ये अतिरिक्त डोस वापरण्याचा सल्ला दिला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि ICMR सह अनेक एजन्सी आणि तज्ञांची टीम यात गुंतलेली आहे. सध्या, यासाठी कोरोना लसीचे अतिरिक्त डोस देण्याची गरज नाही.
नव्या व्हेरिअंटने 5 जणांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारी कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 1828 आहे. दरम्यान देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 झाली आहे. मृतांमध्ये 4 जण केरळ, तर 1 उत्तर प्रदेशातील आहे. तसेच, देशातील मृत्यू दर 1.19 टक्के आहे. यापूर्वी रविवारी देशात कोरोनाचे 335 नवे रुग्ण डिटेक्ट झाले आहेत.