Corona News: कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 5 लाखांच्या पुढे; तज्ज्ञांनी दिला सतर्क राहण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 05:06 PM2022-01-09T17:06:53+5:302022-01-09T17:09:18+5:30
Corona News: तज्ज्ञांनी सांगिल्यानुसार, येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी वाढू शकतो. पण, तीन ते चार महिन्यात कोरोनाची तिसरी लाट कमी होईल.
नवी दिल्ली: भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रथमच नवीन बाधितांची संख्या 1.6 लाखांच्या पुढे गेली आहे. तर, सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाख 84 हजार झाली आहे. दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, देशातील कोविड प्रकरणे लवकरच शिगेला पोहोचू शकतात. मात्र, सध्याची लाट तितक्याच वेगाने कमी होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) अतिरिक्त संचालक डॉ. समीरन पांडा यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ज्या भागात रुग्णांची वाढ नोंदवली गेली आहे, त्या भागात कोरोना रुग्णांची संख्या येत्या 3 ते 4 महिन्यांत कमी होण्यास सुरवात होईल. 50% पेक्षा जास्त ओमिक्रॉन केसेस फक्त मोठ्या शहरांमध्ये आढळत आहेत, असेही ते म्हणाले.
तिसऱ्या लाटेत हॉस्पिटलायझेशन दर कमी
कोरोनाच्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) अध्यक्ष डॉ. एन.के. अरोरा यांनीही पीकबाबत अशीच माहिती दिली आहे. ओमायक्रॉनचा जागतिक डेटा आणि गेल्या 5 आठवड्यांतील आमचा स्वतःचा अनुभव असे दर्शवितो की, बहुतेक ओमायक्रॉन संक्रमण सौम्य आणि लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे याबाबत जास्त चिंताग्रस्त होण्याची गरज नाही. ही तिसरी लाट भयंकर वाटत असली तरी लवकर ओसरण्याची शक्यता आहे.
91% प्रौढांनी लसीचा एकच डोस घेतला
डॉ. अरोरा म्हणाले की, देशातील 80% पेक्षा जास्त लोकसंख्येला नैसर्गिकरित्या विषाणूची लागण झाली आहे. 91% पेक्षा जास्त प्रौढांनी लसीचा एकच डोस घेतला आहे. तर 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 66% लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. अशा स्थितीत तिसऱ्या लाटेचा प्रभाव फार काळ टिकणार नाही.