CoronaVirus News: मराठमोळ्या डॉक्टरांची कमाल! आता कोरोना बरा होणार एका दमात; थेट मुळावरच घाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 06:21 PM2022-02-21T18:21:25+5:302022-02-21T18:24:00+5:30
CoronaVirus News: आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये संशोधन प्रसिद्ध; कोरोना काळात हजारो जणांवर यशस्वी उपचार
मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होणारच नाही अशी खात्री कोणीही देऊ शकत नाही. मात्र देशातल्या एका डॉक्टरांनी कोरोना पूर्णपणे बरा करण्याचा दावा केला आहे. या डॉक्टरांनी त्यांच्या उपचार पद्धतीनं हजारो लोकांना बरंदेखील केलं आहे. या उपचार पद्धतीला आंतरराष्ट्रीय मासिकांमध्येही स्थान मिळालं आहे.
रायगडच्या महाडमधील डॉ. हिमंतराव बावस्कर यांनी मेथिलीन ब्लूचा वापर करून हजारो जणांना बरं केलं आहे. रुग्णांना मेथिलीन ब्लूचा वास घेण्यास सांगून बावस्करांनी रुग्णांना बरं केलं. एँटी व्हायरल औषधींचा गुण न आलेले बहुतांश रुग्ण बावस्करांकडे आले होते. त्यांच्यावर त्यांनी यशस्वी उपचार केले. हिमंतराव बावस्कर प्रख्यात डॉक्टर आहेत. विंचू आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तींवर उपचार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत २०२० मध्ये ऍक्युट रिस्परेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमचा सामना करत असलेल्या रुग्णांना मेथिलीन ब्लूचा वास घेण्यास सांगून बरं केल्याचं बावस्करांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं. या रुग्णांनी आधी remdesivir, favipiravir आणि tocilizumab अशी अँटी व्हायरल औषधं घेतली होती. मात्र ती औषधं घेतल्यानं रुग्ण बरे झाले नव्हते.
२०२१ मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत २०० हून अधिक रुग्णांना याच पद्धतीनं कोरोनामुक्त करण्यात आल्याचं हिमंतराव बावस्कर यांनी सांगितलं. यातील काही जणांची प्रकृती गंभीर होती. बावस्करांच्या कार्याची माहिती जर्नल ऑफ फॅमिली मेडिसिन एँड प्रायमरी केयरमध्ये प्रकाशित झाली आहे. मेथिलीन ब्लूचा वास घेण्यास सांगितलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याचा दावा रिसर्च पेपरमधून करण्यात आला आहे.