'पॉझिटीव्ह' बातमी! देशातील तीन राज्यांमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, राष्ट्रीय दरही कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 05:54 PM2021-05-09T17:54:45+5:302021-05-09T17:55:13+5:30
देशाता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच देशासाठी एक चांगली बातमी देखील समोर आली आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशातच देशासाठी एक चांगली बातमी देखील समोर आली आहे. गेल्या २४ तासांत देशातील तीन राज्यांमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. तर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या राष्ट्रीय दरातही घसरण झाली आहे.
देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४ लाख ३ हजार ७३८ नवे रुग्ण आढळले आहेत. यात देशातील १० राज्यांमध्ये सर्वाधिक ७१.७५ टक्के इतके रुग्ण आहेत. यात महाराष्ट्रात सर्वाधिक ५६ हजार ५७८ रुग्ण आढळले आहेत. तर कर्नाटकमध्ये ४७ हजार ५६३ रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये ४१ हजार ९७१ नवे रुग्ण वाढले आहेत. देशात आतापर्यंत ३० कोटी २२ लाख कोरोनाचा चाचण्या झाल्या आहेत. तर दैनंदिन कोरोना संसर्गाचं प्रमाण २१.६४ टक्के इतकं नोंदविण्यात आलं आहे. देशातील मृत्यू दरात घट झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३७ लाख ३६ हजार ६४८ इतकी झाली आहे. देशाच्या मृत्यूदरात घट होऊन सध्याच्या मृत्यूदर १.०९ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. देशात गेल्या २४ तासांत ४,०९२ लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. यातील ७४ टक्के रुग्णांचा मृत्यू देशातील १० राज्यांमध्ये झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत सर्वाधिक ८६४ रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. तर कर्नाटकात ४८४ जणांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचीबाब म्हणजे देशात अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि लक्षद्वीपमध्ये गेल्या २४ तासांत एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
देशातील लसीकरणाच्या बाबतीत आढावा घ्यायचा झाला तर लसीकरणात आता वेग आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात आतापर्यंत १६ कोटी ९४ लाख लोकांचं लसीकरण झालेलं आहे. यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांमध्ये १७ लाख ८४ हजार ८६९ जणांचं लसीकरण झालेलं आहे.