Corona Omicron Varient: 22 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग, गेल्या 24 तासांत 180 रुग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 05:57 PM2021-12-30T17:57:51+5:302021-12-30T17:58:15+5:30
दिल्लीमध्ये सर्वाधिक 263 रुग्ण असून, महाराष्ट्रात 252 रुग्णांची नोंद झाली आहे.
नवी दिल्ली: गेल्या आठवड्यात भारतात दररोज सरासरी 8,000 हून अधिक कोरोनाची प्रकरणे नोंदवली गेली. एकूणच, कोरोना पॉझिटिव्ह दर 0.92 टक्के आहे. पण, 26 डिसेंबरपासून देशात दररोज 10,000 रुग्णांची नोंद होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मिझोराममधील 6 जिल्हे, अरुणाचल प्रदेशातील एक जिल्हा, पश्चिम बंगालमधील कोलकाता यासह 8 जिल्ह्यांमध्ये 10 टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हीटी दर नोंदवला जात आहे.
लव अग्रवाल पुढे म्हणाले, भारतात कोरोनाव्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकाराची 961 प्रकरणे आहेत, त्यापैकी 320 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील सुमारे 90 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. याशिवाय पात्र वृद्ध लोकसंख्येला एसएमएस पाठवून 10 जानेवारीपासून प्रीकॉशनरी डोस घेण्यास सांगितले जाणार आहे.
मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी प्रीकॉशनरी डोस
आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, सर्व लसी भारत, इस्रायल, अमेरिका, युरोप, ब्रिटन किंवा चीनमधील आहेत. त्यांचे काम प्रामुख्याने रोगप्रतिकार शक्ती तयार करणे आहे. या लसी संक्रमणावर आळा घालत नाहीत. प्रीकॉशनरी डोस हे प्रामुख्याने संसर्गाची तीव्रता, हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू कमी करण्यासाठी आहेत.
ओमायक्रॉनची 180 नवीन प्रकरणे
गेल्या 24 तासांत भारतात कोरोना विषाणूच्या नवीन ओमायक्रॉन प्रकाराची 180 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यासह देशातील एकूण ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या 961 वर पोहोचली आहे. ही एका दिवसातील सर्वाधिक संख्या आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 961 पैकी 320 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
या राज्यात सर्वाधिक रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. यात दिल्लीमध्ये सर्वाधिक 263 रुग्ण आढळले आहेत, त्यानंतर महाराष्ट्रात 252, गुजरातमध्ये 97, राजस्थानमध्ये 69, केरळमध्ये 65 आणि तेलंगणामध्ये 62 रुग्ण आढळले आहेत.
देशात सक्रिय रुग्णांची संख्या 82,402
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात एका दिवसात कोविड-19 चे 13,154 नवीन रुग्ण आढळल्यानंतर, देशातील संक्रमितांची संख्या 3,48,22,040 झाली आहे. सक्रिय प्रकरणांची संख्या 82,402 पर्यंत वाढली आहे. तर, 268 बाधितांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4,80,860 गेली आहे. देशात 49 दिवसांनंतर कोविड-19 चे दररोज 13 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, 11 नोव्हेंबर रोजी 24 तासांत संसर्गाचे 13,091 नवीन रुग्ण आढळले होते. आकडेवारीनुसार, देशात सलग 63 दिवस कोविड-19 चे दैनंदिन रुग्ण 15 हजारांपेक्षा कमी आहेत.