Omicron: ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग डेल्टाच्या तुलनेत अधिक; २५ वर्षाखालील लोक संक्रमित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 05:29 AM2021-12-05T05:29:06+5:302021-12-05T05:29:29+5:30
अमेरिकेतील तज्ज्ञ डॉ.आशिष झा यांचा इशारा, प्रथमत: ‘ओमायक्रॉन’ हा विषाणू डेल्टापेक्षा अधिक वेगाने पसरणारा आहे, असे दिसून येत आहे. किमान दक्षिण आफ्रिकेतील रुग्णसंख्येवरून तरी हाच निष्कर्ष निघतो.
नवी दिल्ली : कोविड १९ विषाणूचा नवा व्हेरियंट ‘ओमायक्रॉन’ याची पसरण्याची गती आधीच्या ‘डेल्टा’ व्हेरियंटपेक्षा अधिक आहे, असा इशारा अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’चे डीन डॉ.आशिष झा यांनी दिला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत झा यांनी सांगितले की, खरे म्हणजे ‘ओमायक्रॉन’ विषाणूबद्दल आताच काही सांगणे कठीण आहे. त्याच्या संदर्भात तीन प्रश्न आपल्यासमोर आहेत. एक म्हणजे, आधीच्या डेल्टा विषाणूपेक्षा हा अधिक वेगाने पसरतो का? दुसरा म्हणजे, त्यामुळे होणारा आजार सौम्य स्वरूपाचा असेल की गंभीर स्वरूपाचा? आणि तिसरा म्हणजे, याच्यावर सध्याच्या उपलब्ध लसी प्रभावी ठरतील का?
झा यांनी सांगितले की, प्रथमत: ‘ओमायक्रॉन’ हा विषाणू डेल्टापेक्षा अधिक वेगाने पसरणारा आहे, असे दिसून येत आहे. किमान दक्षिण आफ्रिकेतील रुग्णसंख्येवरून तरी हाच निष्कर्ष निघतो. हा विषाणू रुग्णांसाठी सौम्य स्वरूपाचा असेल, अशी आशा आपण करू शकतो. तथापि, तो सौम्य स्वरूपाचाच असेल का, याबाबत आपल्याला ठामपणे सांगता येत नाही. दक्षिण आफ्रिकेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. आपण अगदीच घाबरून जायचे कारण नाही. तथापि, हा विषाणू कदाचित डेल्टापेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचा असू शकतो, हे आपल्याला लगेच नाकारता येणार नाही.
झा यांनी सांगितले की, आपल्या सध्याच्या लसी नव्या विषाणूच्या विरोधात कदाचित काम करू शकणार नाहीत. आपल्या लसी अगदीच निरुपयोगी ठरतील, असेही नव्हे, पण त्या पूर्णांशाने काम करू शकणार नाहीत, असे दिसते. येत्या ८ ते १० दिवसांत याबाबत आपल्याला अधिक डाटा उपलब्ध होऊ शकेल. त्यातून लसींच्या प्रभावीपणाबद्दल आपल्याला काहीतरी ठोस सांगता येऊ शकेल. डाटाअभावी आताच काही अंदाज लावणे योग्य ठरणार नाही. आपल्याला ‘ओमायक्रॉन’ विषाणूबद्दल सध्या काहीच माहिती नसली, तरी आपण चिंता करावी, यासाठी अनेक कारणे दिसत आहेत.
बहुतांश रुग्ण २५ वर्षांखालील
दक्षिण आफ्रिकेतील एका डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, नव्या विषाणूचे बहुतांश रुग्ण २५ वर्षांखालील असून, त्यांची लक्षणे सौम्य स्वरूपाची आहेत, याकडे लक्ष वेधले असता, डॉ.झा म्हणाले की, आधीच्या डेल्टा विषाणूची लागण झालेल्या तरुणांतही सौम्य स्वरूपाचीच लक्षणे होती, तरीही त्याने जगभरात हाहाकार उडवून दिला होता, हे नजरेआड करता येणार नाही.