तीन औषधांच्या मिश्रणाच्या साहाय्याने कोरोना रुग्णांवर उपचार करणे शक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 03:26 AM2020-06-10T03:26:20+5:302020-06-10T03:27:03+5:30
भारतीय संशोधकांचा दावा
नवी दिल्ली : प्रयागराजमधील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनानुसार तीन वेगवेगळ्या औषधांनी कोरोनावर उपचार करणे शक्य आहे. येथील ट्रिपल आयटी अप्लाइड सायन्सेस विभागाचे प्रमुख डॉ. प्रीतिश भारद्वाज यांनी हा दावा केला आहे. हे संशोधन टेलर एन्ड फ्रान्सिस समूहाच्या रिसेप्टर्स आणि सिग्नल ट्रान्सडक्शन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
या संशोधनात १५०० औषधांवर परीक्षण करण्यात आले आहे. ही औषधे विविध विषाणू, जीवाणू, कॅन्सर तसेच मलेरिया आदींविरोधात लढण्यासाठी परिणामकारक ठरली आहेत. यातून प्रोटीज कॉम्प्लेक्स, एनएसपी/एनएसपी १० मिथाइल ट्रान्सफेरेज कॉम्प्लेक्सची निवड करण्यात आली आहे.
यातून असेही दिसून आले आहे की, तेसबिवुडीन, ओक्सिटेट्रासायक्लिन डिहायड्रेट, मिथाइल गेलेट, मेरोपेनम, सायक्लोसिटीडीन हायड्रोक्लोराइड आणि ट्राई फ्लुरोडाईन या औषधांतील काही घटक एकत्र करून वापरल्यास कोरोना रुग्णांवर प्रभावी ठरू शकतात. सध्याही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी विषाणूविरोधातील तसेच मलेरियावरील औषधांचाच वापर केला जात आहे. या संशोधनात अलिगड यूनिव्हर्सिटीतील संतोष कुमार मौर्य यांनीही योगदान दिले आहे.