कोरोना रुग्ण कमी झाले, पण अजूनही 'या' 45 जिल्ह्यांमध्ये 10% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 03:10 PM2021-08-09T15:10:50+5:302021-08-09T15:13:34+5:30
Covid-19 Pandemic: आरोग्य मंत्रालयासाठी हे 45 जिल्हे सध्या चिंतेचा विषय बनले आहेत.
नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, पण अजूनही कोरोना रुग्णांच्या संख्येत आपेक्षेप्रमाणे घट होताना दिसत नाहीये. आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकडेवारीनुसार, रविवारी देशभरात 35,499 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, देशभरातील 45 जिल्हे आताही चिंतेचा विषय बनले आहेत. या जिल्ह्यांमध्ये 2 ते 8 ऑगस्टदरम्यान 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेटची नोंद झाली आहे.
पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये केरळ आणि मणिपूरच्या 10-10 जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेशचे 5 आणि हिमाचल प्रदेश, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालच्या 1-1 जिल्ह्यांचा समावेश आहे. तर मेघालयचे 3 , मिझोरमचे 6 , नागालँडचे 4 आणि राजस्थान व सिक्किमच्या 2- 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय, 39 जिल्ह्यांमध्ये 5 ते 10 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे.
सध्या देशात दररोज 35 ते 40 हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. रविवारी 35,499 रुग्णांची नोंद झाली. तर, एकूण मृतांचा आकडा 4,28.309 झाला आहे. याशिवाय, आतापर्यंत 3,11,39,457 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. सध्या देसभरात 4,02,188 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.