देशात कोरोना रुग्ण २४ तासांत दुप्पट; दिल्लीत मास्क वापरणे पुन्हा बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 12:16 PM2022-04-21T12:16:11+5:302022-04-21T12:16:41+5:30
या पार्श्वभूमीवर दिल्ली आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने सार्वजनिक ठिकाणी मास्क पुन्हा बंधनकारक केला आहे.
नवी दिल्ली : देशात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे २,०६७ रुग्ण आढळले; तर ४० जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी असलेल्या नव्या रुग्णांपेक्षा ही संख्या दुप्पट आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. मंगळवारी १,२४७ नवे रुग्ण आढळले होते व एकाचा मृत्यू झाला होता.
या पार्श्वभूमीवर दिल्ली आपदा व्यवस्थापन प्राधिकरणाने सार्वजनिक ठिकाणी मास्क पुन्हा बंधनकारक केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपयांचा दंड आकारला जाईल, असे प्राधिकरणाने बुधवारच्या बैठकीत म्हटले. प्राधिकरणाने संपूर्ण शहरात आक्रमकपणे चाचण्या करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटले की, कोरोना आणखीही लांबणार असेल तर आम्ही कोरोनासोबत जगण्याचे शिकले पाहिजे. रुग्णसंख्या वाढली तर आम्ही कठोर कारवाई करू.
शांघायमध्ये घेतला सात जणांचा बळी
- बीजिंग : चीनचे व्यावसायिक शहर शांघायमध्ये कोविड-१९ मुळे आणखी सातजणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या १७ झाली आहे. दिलासा म्हणजे नव्या रुग्णांमध्ये घट होत आहे, असे आरोग्य आयोगाने म्हटले.
- २,७५३ नवे रुग्णबीजिंगमध्ये मंगळवारी आढळले.
- २,४९४ हे त्यांत एकट्या शांघायमधील होते.
- १७,१६६ जण देशात कोरोनाची लक्षणे नसलेले आढळले. यांतील बहुसंख्य हे शांघायमधील आहेत. शांघायची लोकसंख्या २६ दशलक्ष आहे.
- ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण वाढत चालल्यामुळे गेल्या तीन आठवड्यांपासून शांघायमध्ये लॉकडाऊन लागू केला गेला आहे.
- डिसेंबर २०१९ मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता ४,६५५ झाली आहे. देशात सध्या ३०,७७३ जण रुग्णालयांत उपचार घेत आहेत.