देशात कोरोनाचा जोर वाढला, एकाच दिवसात आढळले 66,999 रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 10:52 AM2020-08-13T10:52:17+5:302020-08-13T10:52:30+5:30
जगभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6644 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या 24 तासात तब्बल 66 हजार नवीन रुग्ण आढळून आले असून आजपर्यंत एकाच दिवसात आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा हा सर्वाधित आकडा आहे. त्यामुळे, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23,96,638 वर जाऊन पोहोचली आहे. मात्र, त्यापैकी एक्टीव्ह रुग्णांची संख्या 16,95,982 एवढी आहे.
जगभरात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 2.74 लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 6644 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे. महासत्ता अशी ओळख असलेला हा देश कोरोनापुढे हतबल झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 53.60 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एक लाख 69 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे.
#COVID19India updates as on 13 August 2020, 8 am
— DD News (@DDNewslive) August 13, 2020
▶️Active cases : 653,622
▶️Cured/Discharge : 1,695,982
▶️Deaths : 47,033 pic.twitter.com/vWKR9zOGFN
भारतात गेल्या 24 तासात 66,999 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर, 942 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे, देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 23,96,638 पर्यंत पोहोचला आहे. त्यापैकी, 16,95,982 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 6,53,622 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आत्तापर्यंत 47,033 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.
दरम्यान, गेल्या 24 तासांत सर्वाधिक रुग्णांची संख्या ही भारत, ब्राझील आणि अमेरिकेतील आहे. तसेच याच तीन देशांमध्ये मृतांचा आकडा देखील वाढत आहे. जगभरातील 20 देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही दोन लाखांवर पोहोचली आहे. यामध्ये इराण, पाकिस्तान, तुर्की, इटली, जर्मनी या देशांची समावेश आहे. कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. तर मृतांच्या संख्येत चौथ्या स्थानी आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.