Coronavirus: ‘कोरोनामुक्त’ भारताच्या दिशेने एक पाऊल पुढे; १ एप्रिलपासून काय होणार बदल?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 11:03 PM2022-03-31T23:03:17+5:302022-03-31T23:03:41+5:30
भारताने निर्बंध हटवले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. हे समजून घेण्यासाठी, सध्या कोविडची स्थिती कशी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
नवी दिल्ली - एकीकडे भारत १ एप्रिल २०२२ पासून पुन्हा कोरोनामुक्त भारताच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे २७ मार्चपासून चीनच्या शांघायमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं आहे. चीन सरकारने झिरो कोविड धोरण स्वीकारले आहे. ज्या अंतर्गत कोविडला देशातून पूर्णपणे नष्ट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मात्र, आकडेवारी पाहता कोरोनाचा नायनाट कुठल्या धोरणाने होईल हे सांगणे कठीण आहे. शून्य कोविड धोरण आणि कडक लॉकडाऊन असूनही, चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्या भारतापेक्षा जास्त आहेत.
जगात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झाली घट
भारताने निर्बंध हटवले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. हे समजून घेण्यासाठी, सध्या कोविडची स्थिती कशी आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आफ्रिकेतील प्रदेशांमध्ये कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या २९ टक्क्यांनी कमी झाली आहेत. अमेरिकेतही १५ टक्क्यांनी घट झाली आहे. युरोपमध्ये, कोरोना विषाणूची नवीन रुग्ण गेल्या आठवड्यापेक्षा ४% कमी नोंदवली गेली आहेत. दक्षिणपूर्व आशियामध्ये कोरोना रुग्णसंख्येत १४% घट झाली आहे.
बहुतेक लोक Omicron चे बळी
गेल्या एका आठवड्यात जगभरात ३ लाख ८२ हजारांहून अधिक कोरोना विषाणूच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली. त्यापैकी ९९.७% रुग्ण ओमायक्रॉनचे होते आणि एक टक्क्यापेक्षा कमी डेल्टा व्हेरिएंटचे होते. म्हणजेच, सामान्यतः यावेळी प्रत्येकजण ओमायक्रॉनचा शिकार होत आहे. ज्या व्हेरिएंटला गंभीर मानलं जात नव्हतं. भारतातही कोरोना विषाणूचे रुग्ण कमी होत आहेत आणि मृतांचा आकडाही नियंत्रणात आहे.
१ एप्रिलपासून बदल
गेल्या २४ तासांत भारतात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात जुन्या १७ मृत्यूंची भर पडली असून, त्यामुळे २४ तासांत एकूण २८ मृत्यूंची नोंद झाली आहे. चीनमध्ये सध्या लॉकडाऊन स्थिती असताना भारतात १ एप्रिलपासून अनेक बदल होणार आहेत.
कॉलर ट्यून यापुढे ऐकू येणार नाही
गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, कोरोना विषाणूच्या संदर्भात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा १ एप्रिलपासून संपुष्टात येत आहे. म्हणजे आता कोरोनाची कॉलर-ट्यून वाजणार नाही. म्हणजेच, जेव्हा तुम्ही एखाद्याला कॉल करता तेव्हा तुम्हाला खोकल्याचा आवाज आणि लसीकरणाचे महत्त्व सांगणारा आवाज ऐकू येणार नाही. आरोग्य मंत्रालयाने या सूचनांचे परिपत्रक सर्व दूरसंचार ऑपरेटरना पाठवले आहे.
महाराष्ट्रातही निर्बंध हटवले
गुढीपाडव्याच्या शुभ मुहुर्तावर महाराष्ट्रातील सर्व निर्बंध हटवले जाणार आहेत त्यामुळे मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल. हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही. लग्न किंवा कौटुंबिक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही. बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. सार्वजनिक ठिकाणं, मॉल, उद्याने याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचं प्रमाणपत्र धाखवण्याची गरज भासणार नाही. गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंती जल्लोषात साजरी करता येणार आहे.
‘या’ एकाच सवयीने कोरोनापासून सुटका
आता दिल्लीत मास्क न घातल्याने दंड आकारले जाणार नाही. वैयक्तिक कारमध्ये मास्क घालण्याची सक्ती संपली आहे. यासोबतच मुंबईने मास्क घालण्याची अटही रद्द केली आहे. त्याबाबतचं पत्र मुंबई महापालिकेकडून पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे मास्क घालण्याची सक्ती नाही. २०० रुपये दंड रद्द करण्यात आला आहे. यासोबतच पश्चिम बंगालनेही मास्क घालण्यावरील बंदी हटवली आहे. तथापि, प्रत्येक राज्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, सोशल डिस्टेसिंग राखणे आणि हात स्वच्छ करणे यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. परंतु कोणताही नियम अनिवार्य ठेवण्यात आलेला नाही. मात्र, एम्सच्या अहवालानुसार, हात धुण्याची आणि लोकांशी हस्तांदोलन न करण्याची सवय कायम ठेवली, तर अनेक आजार टाळता येऊ शकतात.