अनलॉकमध्ये दिल्लीत कोरोनाची वाढ, एकाच दिवसात 2877 पॉझिटीव्ह तर 65 मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 08:47 AM2020-06-19T08:47:56+5:302020-06-19T08:48:45+5:30
देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण गेल्या २४ तासांत आढळले आहेत. देशात १ जून ते १८ जून या काळात तब्बल १ लाख ७६ हजार ४११ नवे रुग्ण आढळले असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे
नवी दिल्ली - केंद्र सरकारने देशातील लॉकडाउन हटवून अनलॉकचा टप्पा सुरु केल्यानंतर राजधानी दिल्ली व मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात तब्बल 2877 नवीन रुग्ण आढळले असून आजपर्यंतचा हा एका दिवसातील रुग्णवाढीचा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे अनलॉकमध्ये दिल्लीकरांची डोकेदुखी वाढल्याचं दिसून येतंय. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १२ हजार ८८१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या लाख ६६ हजार ९४६ झाली आहे. तसेच, २४ तासांत ३३४ जण मरण पावल्यामुळे मरणाऱ्यांची संख्या १२ हजार २३७ झाली आहे.
देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण गेल्या २४ तासांत आढळले आहेत. देशात १ जून ते १८ जून या काळात तब्बल १ लाख ७६ हजार ४११ नवे रुग्ण आढळले असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मृत्यूचे प्रमाणही २.८ वरून ३.३ वर गेले असून, ही चिंतेची बाब आहे. मात्र, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असून, आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३२४ रुग्ण (प्रमाण ५२.९५) बरे होऊ न घरी परतले आहेत आणि सध्या १ लाख ६0 हजार ३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे गुरुवारी देण्यात आली. राजधानी दिल्लीनेही एकाच दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड आज मोडला आहे. दिल्लीत गेल्या 24 तासात तब्बल 2877 नवीन रुग्ण आढळले असून एकाच दिवसात 65 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आजपर्यंत 49,979 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले असून 21,341 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आत्तापर्यंत 1969 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
Delhi reports the highest single-day spike of 2877 #COVID19 positive cases; 65 deaths recorded in the last 24 hours. The total number of cases stands at 49979 including 21341 recovered and 1969 deaths: Delhi Health Department pic.twitter.com/pMf9sPNUUS
— ANI (@ANI) June 18, 2020
दरम्यान जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूंचे प्रमाण अतिशय कमी असून, मृत्यूदरात भारत जगामध्ये आठव्या स्थानी आहे. कोरोनाच्या एकूण बळींपैकी ७0 टक्के रुग्णांना अन्य काही ना काही आजार होते, असे आढळून आले आहे. त्यामुळे अन्य काही आजार असणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकवार स्पष्ट केले आहे. देशातील एकूण रुग्णांपैकी १ लाख १६ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील असून, त्याखालोखाल तमिळनाडू (५0 हजार) दिल्ली (४७ हजार), गुजरात (२५ हजार) आणि उत्तर प्रदेश (१४ हजार ५00) या राज्यांचा क्रमांक लागतो. देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोनाचे रुग्ण आहे. त्यामुळे, राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबईतील वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे.